fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

स्थानिक पोलिसांशी नातं निर्माण करा – रश्मी करंदीकर

पुणे : निर्भय कन्या बनत असताना आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनशी नातं निर्माण करा, कायदे कसे वापरतात याची माहिती करून घ्या जेणेकरून तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला तात्काळ मदत मिळणे शक्य होईल, असा सल्ला पोलीस उपायुक्त आणि गृह विभागाच्या वरीष्ठ प्रशासिक अधिकारी रश्मी करंदीकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाकडून मागील तीन महिने ३२१ महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ राबविण्यात आले. यात संलग्न महाविद्यालयातील ५८ हजाराहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या निमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात डॉ.रश्मी करंदीकर बोलत होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिसभा सदस्य विवेक बुचडे आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी केले होते.

यावेळी डॉ.रश्मी करंदीकर यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सध्या सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून सर्वाधिक फसवणूक होत असून यामध्ये आर्थिक, शाररीक आणि मानसिक छळ होतो. यामध्ये छायाचित्रांचा गैरवापर करणे आदी प्रकार होत आहेत. ‘कस्टम गिफ्ट’ या प्रकारात फसवणूक होणाऱ्यांमध्ये शंभर टक्के महिला आहेत. त्यामुळेच आपण जे माध्यम वापरतो त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि मगच त्याचा वापर करा. केवळ महाविद्यालयात नाही तर शाळा पातळीपासून हे मार्गदर्शन आवश्यक असल्याचेही करंदीकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात मुलीच्या जन्मापासून कौटुंबिक,सामाजिक जीवनापासून तिच्या प्रगती-उन्नती पर्यंत प्रवासाच्या आशयावर आधारित सादर केलेल्या संकल्पना नृत्याला उपस्थितांनी विशेष दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी कल्याण अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थिनी या महिलांनी हजेरी लावली होती.

मुलांनी पालकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये

“मुळात या सर्व प्रक्रियेत मुलं आणि पालकांचा नियमित संवाद होणे फार महत्वाचे आहे. पालक हे अशिक्षित असतील तरीही त्यांना जीवनाचा अनुभव आहे म्हणूनच मुलांनी पालकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. समान वागणुकीच्या बाबतीत स्त्री व पुरुष अशा सगळ्यांनाच मार्गदर्शन गरजेचे आहे.”

– डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading