शरद पवार गटाच्या आठही खासदारांची पंतप्रधान मोदींशी भेट; महाराष्ट्रातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार (NCP-SP)च्या सर्व आठ लोकसभा खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा लोकसभा गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, कांद्याचे दर आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांसह महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडण्यात आले. चंद्रभागा नदीतील प्रदूषणाचाही प्रश्न चर्चेत उपस्थित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना, “आम्ही महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली,” एवढेच सांगितले. बैठकीत नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. NCP-SPच्या सर्व आठ लोकसभा खासदारांची या बैठकीला उपस्थिती होली.
दरम्यान, या भेटीला सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) तसेच महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असताना ही भेट झाली. काँग्रेसने NCP-SPच्या खासदारांना महिला आरक्षणाचा मुद्दा मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडू नये, अशी भूमिका पंतप्रधानांसमोर मांडण्याची विनंती केली होती.
मात्र, सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, FCRA दुरुस्ती विधेयक हा बैठकीचा विषय नव्हता. महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांवरच बैठकीत मुख्यत्वे चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेल्याने या भेटीमागे केवळ राज्यातील प्रश्न आहेत की भविष्यातील राजकीय समीकरणांचाही काही संदर्भ आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, बैठकीनंतर पक्षाकडून भाजपसोबत राजकीय आघाडी किंवा पक्षाच्या भूमिकेत बदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्याशी शेतकरी, शिक्षण आणि NEET पेपरफुटीसारख्या विषयांवर चर्चा केली होती. त्यामुळे सोमवारी झालेल्या भेटीकडे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न केंद्राच्या पातळीवर मांडण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे.
दरम्यान, भाजपकडून या भेटीवर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांबाबतही उत्सुकता वाढली आहे.
