सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाहायला मिळणार आणखी दोन संग्रहालये

‘हेरिटेज वॉक’ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

पुणे : ऐतिहासिक संग्रहालयात असणाऱ्या शस्त्रास्त्राबरोबरच इतिहासातील दुर्मिळ पुस्तके, नाणी आणि दस्तऐवज त्यासोबतच मानवशास्त्र विभागाच्या संग्रहालयाचे विस्तारित दालन आता ‘हेरिटेज वॉक’ दरम्यान पहायला मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१८ पासून वारसा दर्शन उपक्रम आणि संग्रहालय सुरू आहे. दि. १३ एप्रिल २०२२ रोजी या संग्रहालयाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात
इतिहास विभाग, मानवशास्त्र विभाग आणि भूशास्त्र विभाग यांच्या सहभागातून सुरू असलेल्या संग्रहालयाच्या विस्तारित दालनांचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर, मानवशास्त्र विभागप्रमुख डॉ. शंतनू ओझरकर, संज्ञापन अभ्यास विभागप्रमुख डॉ.माधवी रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

इतिहास विभागाच्या दालनात दुर्मिळ ऐतिहासिक नाणी व कागदपत्रांचा तसेच पुस्तकांचा समावेश आहे. ही साधने जमा करून, त्यांचे चिकित्सक परीक्षण करून त्यातून ऐतिहासिक अन्वयार्थ कसा लावला जातो याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने हे दालन कार्यरत राहील.

मानवशास्त्र विभागाने भारतातील आदिवासी जमातींनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध दिलेल्या लढ्याचे प्रदर्शन उभारले आहे. आदिवासी विद्रोहाचे प्रतीक असलेल्या बिरसा मुंडा , तसेच राघोजी भांगरे अश्या आदिवासी क्रांतिकारक तसेच काही आदिवासी विद्रोहांचे माहितीपर फलक नव्या दालनात प्रदर्शित केले आहेत.

या उपक्रमासाठी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

%d bloggers like this: