भारूड, पोवाडा, लोकगीतांतून उलगडला लोकसंगीताचा प्रवास

पुणे : भारूड, पोवाडा, नाट्यगीते, लोकगीतांचे सादरीकरण करीत संगीताचा मूळ गाभा असलेल्या लोकसंगीत आणि ते जपणारे लोककलाकार यांना मानाचा मुजरा करण्यात आला. गण, गवळण, भारूड, पोवाडा आणि लोकगीतांपर्यंतचा प्रवास गायनासोबतचा अप्रतिम वाद्यवादनातून ‘नंदेश उमप रजनी’ या शाहीर नंदेश उमप व सहका-यांच्या कार्यक्रमातून पुणेकरांसमोर सादर झाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात चैत्राली अभ्यंकर व सहका-यांचा ‘आनंदघन’ हा कार्यक्रम हा कार्यक्रम पहिल्या सत्रात पार पडला. तर,  ‘नंदेश उमप रजनी’ हा शाहीर नंदेश उमप व सहका-यांचा कार्यक्रम दुस-या सत्रात झाला.
जय जय रामकृष्ण हरि… च्या गजराने दुस-या सत्राची भक्तीमय सुरुवात झाली. पठ्ठे बापूराव यांच्या ‘आधी गणाला रणी आणला’ या शाहीर साबळे यांनी  संगीतबद्ध केलेल्या गणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. सोड सोड माझी वाट… ही गवळण सादर होताच उपस्थितांनीही त्यावर ठेका धरला. ईश्वराच्या आराधनेपासून ते वेदनेच्या विरहापर्यंत आपण लतादीदींची गाणी ऐकतो. त्या लतादीदींचा स्वर असलेले  जगदीश खेबुडकर यांचे गीत दे रे कान्हा चोळी अन लुगडी… सादर होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले.
पहिल्या सत्रात गायिका चैत्राली अभ्यंकर व सहका-यांनी भारतरत्न  लता मंगेशकर यांची संगीतकार म्हणून ‘आनंदघन’ च्या माध्यमातून असलेली कारकीर्द यावेळी उलगडण्यात आली. शूर आम्ही सरदार… नाव सांग सांग सांग… जीवा  शिवाची बैल जोड… अशी गीते यावेळी सादर झाली. लतादीदींनी गीतांचा संगीतप्रेमींसाठी खुला केलेला अमृतकुंभ ‘आनंदघन’ मैफलीतून ठेवण्यात आला. ठेवण्यात आला. अखेरचा हा तुला दंडवत… या अजरामर गीताने  पहिल्या सत्राचा समारोप झाला. हेमंत वाळुंजकर (गायन), राजेंद्र हसबनीस, उद्धव कुंभार, अनय गाडगीळ, दीप्ती कुलकर्णी, आदित्य गोगटे यांनी साथसंगत केली. केली. विनया देसाई यांनी निवेदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: