S. Balan Trophy – एमईएस इलेव्हन, गेम चेंजर्स इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

पुणे :  पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघ आणि गेम चेंजर्स इलेव्हन या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत शुभम मेद याच्या गोलंदाजीच्या जोरावर गेमचेंजर्स इलेव्हन संघाने केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ७ गडी राखून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना मंदार भंडारी (२५ धावा), रोहीत करंजकर (२४ धावा) आणि दिग्विजय जाधव (२० धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १८.४ षटकात १०७ धावा धावफलकावर लावल्या. गेमचेंजर्स संघाच्या दिव्यांग हिंगणेकर (३-३१) आणि शुभम मेद (३-२३) यांनी अचूक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला मर्यादा आणल्या. हे आव्हान गेमचेंजर्स इलेव्हन संघाने ११.५ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. दिव्यांग हिंगणेकर (नाबाद २६), रोहन दामले (नाबाद २६) आणि तुशार श्रीवास्तव (२० धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला.

दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरी सावंत याच्या कामगिरीमुळे एमईएस इलेव्हन संघाने आयोजक पुनित बालन ग्रुप संघाचा केवळ ३ धावांनी पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. एमईएस इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७५ धावांचे आव्हान उभे केले. अजित गव्हाणे (५१ धावा), रोहीत हाडके (४० धावा) आणि जय पांडे (२७ धावा) यांनी संघाला पावणे दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना पुनित बालन ग्रुपने सावधानकारक सुरूवात केली. परंतु मोक्याच्या क्षणी त्यांचे फलंदाजी बाद होत गेले व सामना त्यांच्या हातून निसटला. सिध्दार्थ मराठे (६९ धावा), मेहूल पटेल (३७ धावा) आणि ऋतुराज वीरकर (२८ धावा) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. परंतु संघाचा विजय केवळ ३ धावांनी दूर राहीला.

Leave a Reply

%d bloggers like this: