Saturday, November 7, 2026
Latest NewsPUNE

स्वर-संवादमध्ये धनंजय दैठणकर, मिलिंद दाते आणि फझल कुरेशी यांचे सादरीकरण

पुणे – डॉ. धनंजय दैठणकर यांचे संतूर वादन, मिलिंद दाते यांचे बासरी वादन आणि उस्ताद फझल कुरेशी यांच्या तबला वादनाने कोथरुडकरांची पाडवा संध्या सूरमयी झाली. गुढीपाडव्याचे औचित्य साधून कलाश्री संगीत मंडळ व बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्या सहकार्याने ‘स्वर संवाद’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बाल शिक्षण शाळेच्या एमईएस सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे जेष्ठ शिष्य मिलिंद दाते (बासरी), पंडित शिवकुमार शर्मा यांचे जेष्ठ शिष्य डॉ. धनंजय दैठणकर (संतूर) आणि उस्ताद अल्ला रख्खा यांचे पुत्र व शिष्य तसेच उस्ताद जाकीर हुसैन यांचे बंधू उस्ताद फझल कुरेशी (तबला) या प्रतिथयश कलाकारांनी आपली कला सादर करून या कार्यक्रमात रंग भरले. पं. धनंजय दैठणकर यांनी राग मधुकंसने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांनी झपताल, दृत एकतालात संतूर वादन केले. त्यानंतर मिलिंद दाते यांनी भूपाळी राग सादर करताना मत्त तालामध्ये बासरीवादन केले. या दोघांनाही फझल कुरेशी यांनी तबला वादन साथ दिली.

त्यानंतर राग किरवाणीमध्ये तीन तालात संतूर, बासरी आणि तबला असे एकत्रित वादन करून या तीनही कलाकारांनी जुगलबंदी सादर केली. या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. या तीनही कलाकारांच्या वादनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद अल्ला रख्खा या तीनही कलाकारांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सोबत वादन केले. या तिघांच्या वाद्यांची देखील एक अनोखी मैत्री होती. मैत्रीचे हेच धागे स्वरसंवादमधून पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कलाकारांना साथसंगत महेश जेस्ते (बासरी), निनाद बर्वे आणि गौरी देशपांडे (तानपुरा), श्रावणी लट्टू, निखिल चौधरी आणि अनुराग जोशी (स्वरमंडळ) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply