Saturday, November 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘गुल्हर’च्या गाण्याला अजय गोगावलेंच्या आवाजाचा सुमधूर स्पर्श

 ‘गुल्हर’ या आगामी मराठी चित्रपटासाठी अजयनं एक सुरेख गाणं गायलं असून, हे गाणं संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारं ठरणार आहे. या चित्रपटाने नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट ज्युरी मेन्शन अॅवॉर्ड, साऊथ इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट फिल्म, मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ज्युरी अॅवॉर्ड हे पुरस्कार पटकावले असून बर्लिन लाईफ ऑफ फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये या चित्रपटाचे ऑफिशियल सिलेक्शन झाले आहे.

शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मच्या बॅनरखाली ‘गुल्हर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रमेश चौधरी यांनी ‘गुल्हर’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं ‘लहर आली, लहर आली गं…’ हे टायटल साँग कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. या गाण्याला अजय गोगावले आणि अपूर्वा निषाद यांच्या आवाजाची सुंदर साथ लाभली आहे. गीतकार वैभव कुलकर्णी यांनी हे गाणं लिहिलं असून, संगीतकार पद्मनाथ गायकवाड यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे.

याबद्दल बोलताना अजय गोगावले म्हणाले की, ‘गुल्हर’ हे या चित्रपटाचं शीर्षक अनाहुतपणे कोणाचंही लक्ष वेधून घेणारं असून, त्याला साजेसं असलेलं ‘लहर आली, लहर आली गं…’ हे गाणं संगीतप्रेमींना एक वेगळीच अनुभूती देणारं आहे. या गाण्याच्या निमित्तानं अप्रतिम शब्दरचनांना सुमधूर संगीताची जोड देण्यात आल्याचं माझं मत आहे. गाणं रेकॅार्ड करताना मला एका वेगळाच आनंद आणि आत्मिक समाधान लाभल्यानं हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं ऐकताना याची अनुभूती नक्कीच येईल.

चित्रपटाची कथा मोहन पडवळ यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटाची वनलाईन खूप सुरेख आहे. पारंपरिक चालीरीतींना मूठमाती देताना त्याविरोधात दंड थोपटत प्राणीमात्रांवर दया करायला शिकवणारी सुंदर कथा ‘गुल्हर’मध्ये आहे. एका ११ वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून ‘गुल्हर’मधील गोष्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत आदी कलाकारांनी या चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा साकारत ‘गुल्हर’च्या कथानकाला न्याय दिला आहे. 

Leave a Reply