Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRA

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना कोकण विभागात सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार जाहीर

ठाणे : राष्ट्रीय मतदार दिनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी उत्कृष्ट कार्य करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ईआरओ, नायब तहसीलदार आणि बीएलओ यांना पुरस्कार जाहीर केले आहेत. कोकण विभागात ठाणे जिल्ह्याला दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना कोकण विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी असा पुरस्कार राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या बीएलओ निर्मला बिरारी यांना उत्कृष्ट बीएलओचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने जिल्ह्यात मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम आणि विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल हे पुरस्कार मिळाले आहेत.

राज्याचे मुख्य  निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणी आणि मतदार याद्या निर्दोष करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी जिल्हा यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याची कामगिरी सरस ठरली आहे, अशी भावना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply