महापालिकेच्या 7 हजार 500 कर्मचाऱ्यांना २१ हजार ९३२ बकेट घनकचरा विभाग देणार
पुणे : नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून बकेटसह बाके, कापडी पिशव्या खरेदी करण्यास महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली होती. मात्र, नागरिकांनी ही निव्वळ उधळपट्टी असल्याची टीका केली.
त्यावर महापालिका आयुक्तांनी देखील मुख्यसभेच्या निर्णयानंतरही वॉर्डस्तरीय निधीच्या या खर्चावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. सध्या केवळ कचरा वेचकांसाठी आवश्यक असलेल्या ८० लिटर क्षमतेच्या बकेट खरेदीला मान्यता दिली जात आहे.
नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागामध्ये नागरिकांना घरोघरी वाटप करण्यासाठी छोटे कचऱ्याचे बकेट, कापडी पिशव्या, सोसायट्यांमध्ये बाके, तर कचरा संकलनासाठी ढकलगाडी घेण्यावर जोर असतो. या वस्तूंवर नगरसेवकांचे नाव असल्याने केलेल्या कामाचा प्रचार करता येतो. यासाठी दरवर्षी लाखो रुपयांच्या या खरेदीसाठी प्रयत्न असतो. पण ही खरेदी झाल्यानंतर त्यांचे वाटप कोणत्या पद्धतीने झाले, कोणाला वाटले याची कोणतीही नोंद महापालिकेकडे नसते. त्यामुळे वॉर्डस्तरीय निधीतील ही खरेदी कायम वादात सापडते. गेल्या दोन वर्षांपासून या खरेदीवर बंदी असताना नोव्हेंबर महिन्याच्या मुख्यसभेत प्रत्येक नगरसेवकाला ५ लाखापर्यंत बाके तर ५ लाखापर्यंत पिशव्या, बकेट आणि ढकलगाडी खरेदी करण्यास मान्यता दिली. या निर्णयासह शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी विरोध दर्शवून आयुक्तांनी या निर्णयाची अंमलबजावणी करू नये अशी मागणी केली होती.
महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे स्वच्छ संस्थेच्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना एका वर्षात ८० लिटर क्षमतेच्या चार बकेट पुरविल्या जातात. यासाठी २ कोटी ७ लाख रुपयांची निविदा भांडार विभागामार्फत काढण्यात आली आहे. तर, क्षेत्रीय कार्यालयांकडून महापालिकेच्या ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांना
देण्याची मागणी घनकचरा विभागाकडे नोंदविली असून, २१ हजार ९३२ बकेट खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.
नगरसेवकांकडून ७६ लाखाची खरेदी
नगरेसवकांना घराघरांत देण्यासाठी छोटे बकेट खरेदीस बंदी असली तरी वॉर्डस्तरीय निधीतून ८० लिटर क्षमतेचे बकेट घेता येतात. त्यासाठी २२ नगरसेवकांनी आतापर्यंत ७५ लाख रुपयांचे बकेट खरेदीसाठी भांडार विभागाला पत्र दिले आहे. यात बहुतांश नगरसेवकांनी प्रत्येकी २ लाखाचा निधी दिला आहे. तर दोन नगरसेवकांनी प्रत्येकी १० लाख व दोन नगरसेवकांनी प्रत्येकी ९ लाखाची तरतूद बकेट खरेदीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
शहरात कचरा संकलनासाठी केवळ ८० लिटर क्षमतेच्या बकेट खरेदीलाच मान्यता दिली जात आहे. नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून छोटे बकेट घेण्याचे प्रस्ताव अद्याप मान्य केले नाहीत.
