Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

PMPML कामगारांची अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेच्या थकीत वैद्यकीय बिलांची पूर्तता तातडीने करा – आम आदमी पार्टी

पुणे : पीएमपीएमएल कामगारांना अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेतून करावयाच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीबाबत आम आदमी पक्षाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात प्रचंड दिरंगाई होत असल्याचे आपच्या निदर्शनास आले आहे. वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीमध्ये मोठा भ्रष्टाचार चालत असल्याच्या तक्रारी देखील आम आदमी पक्षास प्राप्त झाल्या आहेत. याची दाखल घेवून PMPML कामगारांची अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेच्या थकीत वैद्यकीय बिलांची पूर्तता तातडीने करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

आम आदमी पक्षाला मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीएमएल सेवेत असलेल्या पीएमपीएमएल कामगारांची अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेतून आत्तापर्यंत केवळ नोव्हेबर २०१८ पर्यंतच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केवळ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया केवळ ३० दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असताना वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीसाठी ३ वर्षांचा विलंब लागणे ही पीएमपीएमएल प्रशासनाबद्दल अतिशय लाजिरवाणी आणि कामगारांसाठी अतिशय वेदनादायी बाब आहे. पीएमपीएल प्रशासनामधील ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि कामगारांप्रती असंवेदनशीलता यातून प्रकट होते.

जवळजवळ गेली दोन वर्षे कोविडची जागतिक साथ सुरु असताना हॉस्पिटलची बिले ३ वर्षे थकीत राहणे हे माणुसकीच्यासुद्धा विरुद्ध आहे. कित्येक कामगारांनी रुग्णालयाची बिले भरण्यासाठी उसनवारी केलेली आहे, कर्ज घेतलेले आहे. अशा वेळी अडवणूक करत वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती वेळेत न करणे हे असंवेदनशील प्रशासनाचे लक्षण आहे.

पीएमपीएमएल कामगारांची अनेक वर्षांची थकीत वैद्यकीय बिलांची अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेतून तातडीने पुर्तता करा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी आज निवेदनाद्वारे चेतना केरुरे (सह-व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल) यांच्याकडे केली. यावेळी आपचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे आणि घनश्याम मारणे (बिबवेवाडी वार्ड कार्याध्यक्ष) उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading