Sunday, July 19, 2026
Latest NewsMAHARASHTRA

नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव; मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील

पिंपरी : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे.

ते म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेची तूलना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी करणे हास्यास्पद आहे. त्यांच्या सुरक्षेची तूलना देशातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी करणे असा प्रकार नाना पटोलेच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान असून ते जागतिक नेते आहेत, हे पटोले यांनी तुलना करताना विसरू नये.

त्यांनी सांगितले की, नाना पटोले यांनी पंतप्रधानांविषयी आज घडलेल्या घटनेबाबत बोलताना राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याची आठवण करून दिली आहे. अशी आठवण करून देऊन नाना पटोले यांना धमकी द्यायची आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. आज मोदीजींच्या गाडीवर हल्ला होण्यासाठी पटोले यांच्या पक्षाच्या सरकारने ढिसाळपणा केला का, हे सुद्धा त्यांनी सांगावे.

ते म्हणाले की, पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती त्याचा उल्लेख नाना पटोले यांनी बलिदान असे म्हणत आज केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या जीवघेण्या ढिसाळपणामुळे आज निर्माण झालेल्या परिस्थितीत इंदिराजींच्या हत्येचा उल्लेख करून नाना पटोले यांना काय सुचवायचे आहे, हे ही त्यांनी सांगावे.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या धमक्यांना भाजपा घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचे आशिर्वाद मिळालेले आहेत आणि त्या आशिर्वादांचे भक्कम कवच त्यांच्याभोवती आहे, असे पाटील यांनी ठणकावले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading