‘तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार‘ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन उन्नत मार्गांच्या (Elevated Corridor) प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत असून, हे प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या मोठ्या अडचणी असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उन्नत मार्ग उभारण्यात येत आहेत. या तिन्ही प्रकल्पांमुळे वाहतुकीचा वेग वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रदूषणातही लक्षणीय घट होईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त केले. पोलाद व सिमेंटवरील राज्य शासनाचा जीएसटी हिस्सा माफ करण्यात आला असून, वाळू, खडी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील स्वामित्व धनातही सवलत देण्यात आली आहे. तसेच, भूसंपादन प्रक्रियेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य केल्यामुळे प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रस्ते व पुलांच्या बांधकामात जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले की, ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट काँक्रिट’ (UHPFRC) या तंत्रज्ञानामुळे पुलांमधील दोन खांबांतील अंतर ३० मीटरवरून १२० मीटरपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. त्यामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच एकाच खांबावर रस्ता, पूल आणि मेट्रो अशी आधुनिक रचना उभारणे शक्य होणार आहे. पुलांच्या सुरक्षिततेसाठी रबरी बेअरिंग्ज आणि एक्स्पान्शन जॉइंट्सच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिल्या.
पुणे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर या नव्या महामार्गामुळे सुमारे ४० ते ४५ टक्के वाहतूक पुणे आणि मुंबईत प्रवेश करणार नसल्याने दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा ऐतिहासिक प्रकल्प ठरत असून, वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याबरोबरच ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेल्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यातील इतर महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचाही आढावा घेताना गडकरी यांनी सांगितले की, नाशिक फाटा-खेड या ३० किलोमीटर लांबीच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, भूसंपादन पूर्ण होताच काम सुरू होईल. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. तसेच, ठाणे-पुणे-शिरूर-छत्रपती संभाजीनगर या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
