‘लवकरच पुणे होणार राज्यातील अत्यंत सुसज्ज शहर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
पुणे प्रतिनिधी
पुणे शहर आणि परिसराच्या भविष्यातील गरजांचा विचार करून नियोजनबद्ध आणि एकात्मिक पद्धतीने विकास करण्याची पावले सरकारने वेळे आधीच उचलली असल्यामुळे लवकरच पुणे शहर आणि परिसर हा राज्यातील अत्यंत सुसज्ज परिसर ठरेल आणि राज्याच्या प्रगतीचे केंद्र म्हणून पुणे सन २०३० पर्यंत अधिक सक्षम होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन उन्नत महामार्गांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पुणे परिसराला वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. ही समस्या दूर करून आणि पुढे परिसराच्या भविष्यातील विस्ताराचा आणि त्यानुसार गरजांचा विचार करून सरकारने पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विभागाच्या एकात्मिक विकासाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी पुणे शहरातून बाहेर पडून नजीकच्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या पुणे ते शिरूर, हडपसर ते यवत आणि तळेगाव,चाकण, शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्याचा विचार करून या या मार्गांच्या वर मेट्रो सुरु करता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर या उन्नत मार्गांचे काम देताना कंत्राटदारांना वाढीव नफा मिळण्यापेक्षा सरकारच्या महसुलात वाढ व्हावी, अशा प्रकारचे नवीन सूत्र या यावेळी अंगी करण्यात आले आहे. त्यामुळे या तिन्ही उन्नत महामार्गाच्या कामातून सरकारलाच तब्बल 950 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला.
एकेकाळी स्वप्नवत वाटणाऱ्या पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे काम 50 टक्के पूर्ण झाले असून तब्बल 91 टक्के जमीनधारकांनी स्वखुशीने जमीन देण्यास तयारी दाखवली आहे. त्यामुळे उर्वरित कामही लवकरच पूर्ण करून विमानतळाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. या विमानतळापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी दिवेघाटात दुहेरी बोगदा वरून एका बाजूने रस्ते वाहतूक व दुसऱ्या बाजूने मेट्रो सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
पुणे शहर आणि परिसर या पुढील काळात विस्तारतच जाणार आहे. त्या दृष्टीने वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. त्यादृष्टीने या परिसरासाठी पाण्याचे नवीन स्रोत विकसित करणे, जागतिक बँकेच्या मदतीने या परिसरातील शंभर टक्के पाणी प्रक्रिया करून पुनर्वापरास योग्य करणे असे प्रयत्न सुरू असून या वर्षातच पुणे शहराच्या सर्व भागांना समान पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर स्वरूपाची असून त्यामुळे प्रदूषणातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पुण्यातून मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक या सर्व ठिकाणी जाण्याकरता मोठ्या प्रमाणावर गर्दीला सामोरे जावे लागते. हे महामार्ग रुंद करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे मलेशियामध्ये विकसित झालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर उन्नत महामार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या महामार्गांवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर पुणेकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. पुणे मुंबई मार्गावरी नवी मुंबई, पनवेल ची गर्दी टाळण्यासाठी अटल सेतू, जेएनपीटी मार्गे नवा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार असून त्यामुळे पुणे मुंबई प्रवासातील वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे, असे गडकरी यांनी नमूद केले. ठाणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या धर्तीवर नव्या पुण्याच्या उभारणीची गरज
आपण कितीही रस्ते आणि पूल बांधत गेलो तर लोकही येतच राहतील आणि कोंडीही वाढत राहील. एखाद्या शहरात किती लोक असावेत याला मर्यादा आवश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर नव्या पुण्याची उभारणी गरजेची असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीएमआरडीए क्षेत्रात छोटी शहरे आणि टाऊनशिप्स उभारण्याचे नियोजन असून त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरी सुविधांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, असे स्पष्ट केले.
