पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर‘ ठरतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे | प्रतिनिधी
पुण्याच्या वाढत्या शहरी विस्तारामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून प्रस्तावित पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून हे मार्ग खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्या नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत आहेत. या प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे.
पुणे-शिरूर उन्नत मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञान व बहुविध वाहतूक जोडणीच्या संकल्पनेवर आधारित असून, हडपसर-यवत मार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळेची बचत होईल. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गामुळे औद्योगिक पट्ट्याला आधुनिक रस्ते संपर्क मिळून मालवाहतुकीला वेग येईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
पुणे हे शिक्षणाबरोबरच उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत असल्याचे नमूद करत त्यांनी पुणे मेट्रो, रिंग रोड, विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा विस्तार, हिंजवडी आयटी पार्क तसेच चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, राज्याला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून हवामान बदलाचा सामना करू शकतील अशी दर्जेदार कामे करण्यात येत आहेत. देशाला पाच ट्रिलियन डॉलर आणि महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्षम रस्ते पायाभूत सुविधा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्याची वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास, आयटी क्षेत्राचा विस्तार आणि शिक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्योन्मुख नियोजन करण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी सासवड-पुरंदर विमानतळ, शहराचा विस्तार आणि ३०० किलोमीटरहून अधिक सायकल मार्गांच्या विकासालाही गती दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून भूसंपादनातील अडचणी दूर करून हा प्रकल्पही लवकर मार्गी लावावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पांमध्ये चौपदरी, सहापदरी आणि उन्नत मार्गांचा समावेश असून ते पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लांबीचा उन्नत मार्ग निर्माण होणार असल्याचेही मंत्री भोसले यांनी सांगितले.
कार्यक्रमास आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम काकडे, भीमराव अण्णा तापकीर, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासने, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी प्रास्ताविक केले.
