शाश्वत भविष्यासाठी ‘वनौषधी’ ही काळाची गरज – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : ‘कोविड-१९’ या जागतिक महामारीमुळे पारंपरिक औषधांचे आणि वनौषधींचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शाश्वत भविष्यासाठी ‘वनौषधी’ ही काळाची गरज असल्याचे आधुनिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. निसर्गतः भारतीय वनांमध्ये औषधी वनसंपदा विपुल प्रमाणात आढळते. वन क्षेत्रातील दुर्मीळ औषधी वनस्पतींचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच त्यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे असल्याने शेताच्या बांधांवर, कोरडवाहू शेतीमध्ये, तसेच पडीक, डोंगराळ व मुरमाड शेतजमिनीवर औषधी वनस्पतीची लागवड केल्यास अतिरिक्त जमीन हरित आच्छादनाखाली येऊ शकेल. ज्यातून मृदा-जल संधारण, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण संतुलनाला हातभार लागेलच. शिवाय आदिवासी व शेतकरी कुटुंबांना उपजीविकेच्या नव्या संधीही प्राप्त होतील. भविष्यात वनराई आणि वन विभागामार्फत राज्यातील वन संवर्धन, पर्यावरण तसेच विविध लोकपयोगी कामे करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
वनौषधी: शाश्वत भविष्यासाठी… या विषयावरील “वनराई वार्षिक विशेषांक” प्रकाशन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाइकडे, डॉ. दिगंबर मोकाट, सीएसआर प्रमुख सीमा पावसकर, जयवंत देशमुख, नगरसेवक आबा बागुल, डॉ. सतिश देसाई उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ‘आयुष आपके द्वार’ या मोहीमेअंतर्गत नागरिकांना वनौषधी रोपांचे निशुल्क वाटप झाले.
वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले की, लोकशिक्षण, प्रबोधन व जनजागृती घडवून आणण्यासाठी ‘वनराई’च्या वतीने गेल्या तीन दशकांपासून ‘वनराई’ मासिक प्रकाशित केले जात आहे. राज्यामध्ये वनौषधींची लागवड, त्यावरील संशोधन, प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग, प्रचार-प्रसार आणि या वनौषधींचा प्रत्यक्ष वापर वाढवण्याला मोठ्या प्रमाणात वाव आहे. ज्यामुळे आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा तुटवडा असणाऱ्या दुर्गम, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकेल आणि ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास हातभार लागू शकेल. गुणवत्तापूर्ण वनौषधींचा तुटवडा, औषधी वनस्पतींच्या नावाने होणारी भेसळ आणि सर्व स्तरांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा व माहितीचा असणारा अभाव अशी अनेक आव्हाने या क्षेत्राला भेडसावत आहेत. म्हणूनच या विषयावर तज्ज्ञांचे विचारमंथन घडवून आणण्याबरोबरच, या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याकरिता ‘वनौषधी: शाश्वत भविष्यासाठी…’ हा विशेषांक प्रकाशित करत आहोत.
