मास्क नाही पुणे महापालिका इमारतीत प्रवेश नाही
ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने महापालिकेचा निर्णय
पुणे : राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने राज्य सरकारने नवे निर्बंध लादले आहेत. पुण्यात देखील या नव्या विषाणूनचे रुग्ण आढळल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही मास्क नाही तर महापालिकेत प्रवेश नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच तोंडावर मास्क नसल्यास आज पासून ५०० रुपये दंड ठोठावण्यास सुरवात केली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरीही अद्याप अनेक नागरिक बिनधास्तपणे नियमांचे पालन न करता शहरात फिरत आहेत. महापालिका भवनात रोज हजारो नागरिक विविध कामासाठी येतात. त्यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. मास्क असला तरी तो हनुवटीला लावतात किंवा खिशामध्ये ठेवत आहेत. अशा नागरिकांवर आजपासून (ता.१०) प्रशासनाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘आजपासून महापालिकेत कारवाई सुरू केली असून, एका व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड केला आहे. मास्क घातल्याशिवाय महापालिकेत कोणालाही प्रवेश मिळणार नाही. तसेच शहरात क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
