सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान समारंभ
तीन हजार आठशे विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदव्या मिळणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११९ वा पदवी प्रदान समारंभ उद्या (दि. १३ डिसेंबर) सकाळी ११ वाजता विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात पार पडणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ‘ऑस्ट्रेलियन काऊंसलेट जनरल’ पिटर ट्रसवेल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सन्माननीय अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. तर राज्यपाल तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्ष स्थानी असतील
या पदवी प्रदान समारंभात सन ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० या वर्षात व तत्पुर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. त्यापैकी ४३ पीएच.डी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले विद्यार्थी आहेत अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा पदवी प्रदान समारंभ मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी त्यासाठी विद्यापीठात हजर राहण्याची आवश्यकता नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या समारंभाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
पदवीदान समारंभ पुढील लिंकवर पाहता येईल.
http://webcast.unipune.ac.in
