‘हा’ आठवणीत राहणारा क्षण – सुनेत्रा पवार
पुणे : एका बाजूला लाईम लाईट, दुसऱ्या बाजूला लाईव्ह चित्र रेखाटन आणि त्याला अमर ओक यांच्या सुरेल बासरी वादनाची साथ … माझ्यासाठी हा आठवणीत राहणारा क्षण असून मी या अनुभवाने भारावून गेले आहे, अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी आज व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दीवा प्रतिष्ठान आणि दीपक मानकर यांच्या वतीने बालगंधर्व येथे पाच दिवसीय चित्र- शिल्प संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज चौथ्या दिवशी सुनेत्राताई पवार यांनी भेट देत सहभागी कालावंतांशी संवाद साधला. यानंतर ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार प्रमोद कांबळे यांनी अवघ्या 12 मिनिटात सुनेत्राताई पवार यांचे अतिशय सुंदर पोट्रेट रेखाटले. या प्रसंगी सुनेत्राताई पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी आयोजक दीपक मानकर, पीएनजीचे सौरभ गाडगीळ, ऍड. पुष्कर दुर्गे, चारुहास पंडित, चंद्रशेखर डहाणे, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, दत्ता सागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्र- शिल्प संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, याचा आनंद आहे. कोरोनाच्या अलीकडच्या काळात आपल्या राज्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे, हे खूप गरजेच होते. ते मिळवून देण्याचे काम दीपकभाऊ मानकर यांनी केलेले आहे. आज येथे आल्याने अनेक मनाला भावणाऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या, लाईव्ह काम पाहायला मिळाले. माझ्यासाठी हा आठवणीत राहणारा क्षण असून मी या अनुभवाने भारावून गेले आहे.
‘चित्र – शिल्प संवाद’ च्या दुपारच्या सत्रात चित्रकार मनोज सकळे यांनी दीपक मानकर यांचे पोट्रेट रेखाटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि योगेश सुपेकर यांनी केले.
