आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – केशव उपाध्ये
मुबंई : आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने या परीक्षेतील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्यमंत्र्यांवर आली आहे. ही परीक्षा देणाऱ्या सुमारे दहा लाख उमेदवारांचे नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नसून विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी भाजपचे केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.
मुळात या खात्यातील सहा हजारांहून अधिक जागांची भरती रखडवून ठाकरे सरकारने उमेदवारांना नैराश्यात ढकलले होते. वारंवार मागणी करूनही परीक्षांबाबत चालढकल करण्यात येत होती. अशा वेळी परीक्षांच्या काही तास अगोदर काही उमेदवारांना व्हॉटसअप, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका मिळाल्या, अखेरच्या क्षणी वेळापत्रक बदलून परिश्रमपूर्वक तयारी करणाऱ्या उमेदवारांची फसवणूक करण्यात आली. पेपरफुटी ही अफवा नसल्याचे सिद्ध होऊनही आरोग्यमंत्र्यांनी वारंवार त्यावर मौन धारण केले, आणि आता या परीक्षेतील गैरव्यवहारांचे बिंग फुटल्यावर मात्र ते मूग गिळून गप्प बसले आहेत. त्याची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.
ठाकरे सरकारने प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही वेठीस धरून प्रश्नपत्रिकांच्या धंद्यास हातभार लावल्याचे आता उघड झाले असून आरोग्य खात्यात असलेल्या वाझे प्रवृत्तींचा यामध्ये हात असल्याचे दिसू लागले आहे. पेपरफुटीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर मंत्र्यांची मेहेरनजर होती का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
