आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राध्यापक देणार विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभागाला धडे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘पाली व बौद्ध अध्ययन’ विभागासाठी विद्यापीठाकडून नुकतीच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सहा परदेशी प्राध्यापकांची मानद संलग्न प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर म्हणाले, विभागातील विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करणाऱ्या अनेक नामवंत प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
यातील बहुतांश प्राध्यापक हे यापूर्वी आपल्याकडे ‘ख्येन्त्से फाऊंडेशन, इंडिया’ अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, मात्र आता विद्यापीठाने यांना मानद संलग्न प्राध्यापक म्हणून मान्यता दिली आहे. या प्राध्यापकांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांना तर फायदा होईलच पण त्याबरोबरच विद्यापीठाचे मानांकनही उंचावण्यात मदत होईल, असेही देवकर यांनी सांगितले.
याच्या जोडीला विभागाने ‘ख्येन्त्से फाऊंडेशन, इंडिया’ या संस्थेसोबत सामंजस्य करार केला असून त्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राध्यापक विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून येत्या काळात विविध कार्यशाळा, विशेष अभ्यासक्रम घेणार आहेत तसेच विभागीय संशोधनामध्ये देखील मोलाचे योगदान करणार आहेत. यातील अनेक प्राध्यापक हे अमेरिका, जर्मनी, इग्लंड आणि थायलंड आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत. २०१५ या वर्षांपासून विभाग या संस्थेसोबत काम करत असून आजतागायत .. विद्वानांनी विभागात अध्ययन केले आहे. पाली, बौद्ध संस्कृत आणि बौद्ध अध्ययन या विषयातील संशोधनाला चालना देण्याच्या हेतूने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम
विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन या विभागात सध्या संस्कृत व पाली व्याकरण ग्रंथ, शब्दकोश प्रकल्प, बौद्ध वारसा व पर्यटन आदी विषयांवर प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी काम करत आहेत, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांनी दिली.
