Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 9 : कोरोनाच्या  तिसऱ्या संभाव्य लांटेचा धोका लक्षात घेता या काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन करा.  त्यामुळे रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होईल, आशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी  मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.  यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आतापर्यंत जवळपास १००० खाजगी डॉक्टरांशी संवाद साधण्यात आला आहे.

या सभेच्या प्रारंभी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. तसेच आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच   राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

घरी उपचारातील रुग्णांकडे लक्ष देणे गरजेचे 

लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल. घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळताहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading