Friday, October 23, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

डॉ. कल्याण गंगवाल यांची कोरोना काळात मोफत समुपदेशन

पुणे, दि. ९ : कोरोना काळात काही खाजगी आणि कॉर्पोरेट रुग्णालय, तसेच तेथील डॉक्टर रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली नफा कमावण्याचा विचार करीत आहेत. मात्र पुण्यात असेही काही डॉक्टर आहेत की या  काळात रूग्णांना मोफत उपचारच नव्हे; तर पदरमोड करून त्यांची सेवा करत आहेत. त्यापैकीच एक आहेत डॉ. कल्याण गंगवाल आणि त्यांचे संपूर्ण डॉक्टर कुटुंब. कोरोना रुग्णांच्या मनातील भीती घालवणे, त्यांना आधार देणे, समुदेशन करून त्यांचा मनातून नकारात्मकता काढून टाकणे अशी सर्वकाळ सेवा ते करीत आहेत.
डॉ. कल्याण गंगवाल आज ७६ वर्षांचे झाले आहेत. पुना हॉस्पिटल आणि केईम हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून गेली ४५ वर्षे प्रॅक्टिस करत असलेले डॉ. गंगवाल वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवीच्या (डीएनबी व इतर) विद्यार्थ्यांनाही शिकवतात. सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या डॉ. गंगवाल यांनी पुढील काळातही त्यांचे व्रत सोडले नाही. उलट आणखी उत्साहाने ते काम करत आहेत. गेल्या वर्षी कोरोना आल्यानंतर लोक दरवाजाआड बंदिस्त झाले. यामधूनही मार्ग काढत रुग्णांची सेवा त्यांनी चालू ठेवली. डॉ. गंगवाल यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर वैद्यकीय सल्ला देण्यास सुरुवात केली. मोबाईलवरून माहिती घेऊन ते उपचार सांगत आहे. ज्यांना आणखी तपशिलात जाऊन माहिती घ्यायची असेल, त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल करून ते उपचार करतात. सुरुवातीला दिवसाला दहा ते बारा कॉल त्यांना यायचे. आता ही संख्या शंभरच्या पुढे गेली आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे; तर संपूर्ण भारतातून त्यांना कॉल येत आहेत.
आपले अनुभव सांगताना डॉ. गंगवाल म्हणाले,  “गेल्या आठवड्यात रात्री दीड वाजता इंदोरवरून कॉल आला. यामध्ये एका कुटुंबाला कोरोना झाला होता. कुटुंबातील तरुण मुलांच्या मनात भीतीने इतकी नकारात्मक भावना भरली होती की, ते एवढ्या रात्री घरातील सर्वांना आता आपण मरणार असे सांगत होते. मात्र नाईलाजाने त्या कुटुंब प्रमुखाने कॉल करून सर्वांचे समुपदेशन करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांची भीती दूर झाली.

शेवटी ते म्हणतात, “वैद्यकिय सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी कोरोना काळात पुण्य करण्याची संधी समजून रुग्णांची सेवा करावी. तुम्ही जितकी लोकांना मदत कराल, तितके कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तुम्हाला परत मिळेल. माझ्या हाताखालील अनेक डॉक्टरांनी माझ्या अनुकरण करीत समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे.” गरजू रुग्णानी मोफत समुपदेशानासाठी ९८२३०१७३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
गरीब नागरिकांना आर्थिक मदत:
गरीब रुग्णांना मोठमोठ्या रूग्णालयात महागडे उपचार परवडत नाहीत. त्यांनाही डॉ. गंगवाल यांनी आर्थिक मदत; पण थेट रूग्णालयाला केली आहे. सर्वजीव मंगल प्रतिष्ठानद्वारे ही मदत केली जाते. आतापर्यंत त्यांनी जवळपास दीडशे रुग्णांना उपचार, औषधे यासाठी मदत केली आहे. या कार्यात त्यांची पत्नी डॉ. चंद्रकला, मुलगा डॉ. परितोष, डॉ. आनंद, सून डॉ. सीमा गंगवाल हे सगळे मदत करतात. डॉ. गंगवाल  दाम्पत्याने आपली स्नुषा डॉ. सीमा व नातू सिद्धार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त (९ मे) गरजू कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी १ लाख ११ हजार रुपयांचा निधी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading