Tuesday, September 1, 2026
PUNE

आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.27, कोणत्याही आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगतानाच कोरोना चाचण्यामध्ये पुणे देशात आघाडीवर असून कोरोना चाचण्या वाढविल्यामुळे कोरोनाचे निदान वेळेत होवून रुग्णाला वेळेत उपचार मिळतात, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही पुणे जिल्हयात समाधानकारक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे सांगितले.
येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये भारतीय जैन संघटना व पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ॲण्टीजन चाचणी केंद्राची पाहणी तसेच लॉकडाऊन कालावधी दरम्यान केलेल्या कार्याच्या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक अविनाश साळवे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, साहिल देव आदी मान्यवर उपस्थित होते.
देशात, राज्यात ज्यावेळी नैसर्गिक संकट येते, त्यावेळी सामाजिक संस्थांच्या मदतीची आवश्यकता असल्याचे सांगून आयुक्त राव म्हणाले, भारतीय जैन संघटनेसारख्या अनेक सामाजिक संस्था कोरोना संसर्गाच्या कामातही कार्यरत आहेत, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यामुळे अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी गतीने होण्यास मदत झाली असून यामध्ये वेळेत कोरोनाचे निदान झाले, निदान झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ झाले आहे. कोरोनाचे वेळीच निदान झाल्याने मृत्यूदर कमी करण्यासही मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त राव म्हणाले, पुणे महानगरपालिका क्षेत्रात देशात सर्वाधिक कोरोना निदानाच्या चाचण्या होत आहेत. सलग 52 दिवसापासून पुणे कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांमध्ये आघाडीवर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानकारक बाब आहे. कोरोनातून बरे झालेल्या व प्लाझ्मादान पात्रतेचे निकष पूर्ण करत असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे, याकामी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांनी मदतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. कोरोना निदानासाठीच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. निदान व उपचार वेळेत होतील याकडे विशेष लक्ष असून लवकरच पुणे कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा तसेच नगरसेवक अविनाश साळवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पुणे शहरात मिशन झिरो कार्यक्रमांतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती तसेच कोरोनाचे लक्षणे दिसत असल्यास आणि वयोवृध्द व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading