fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी साकारली ‘कोविड लॉकआऊटनंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली’

पुणे, दि. 14 – भक्तांना मंदिरात असलेल्या त्यांच्या देवतांचे सुरक्षित व कोरोनाने संक्रमित न होता सगुण दर्शन घेता यावे, याकरीता कोविड लॉकआऊटनंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली ही पुस्तिका महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी एकत्रित येऊन साकारली आहे. सध्या मंदिरे बंद असल्याने पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरासमोर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुस्तिकेचे लेखक व संकलक प्रा.राजेंद्रकुमार सराफ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे ह.भ.प.शिवाजीराव मोरे, श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपूरचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, श्री आळंदी देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, श्री देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकरराव मोरे, विश्वस्त अजितराव मोरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, सुनील रासने आदी उपस्थित होते.

ह.भ.प.शिवाजीराव मोरे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क करुन एक चर्चासत्र व एक कार्यशाळा गुगल मिटवर आयोजित करण्यात आली होती. यात मंदिराचे विश्वस्त, प्रमुख, पुजा-यांनी सहभाग घेतला. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठी श्रद्धास्थाने, देवस्थान ट्रस्ट व मंदिर व्यवस्थापन समिती यांना एकत्र गुंफण्याचे काम यामुळे झाले आहे.

प्रा.राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये मंदिराचे अर्थकारण, कोविड विषाणू व भक्तांची तपासणी, कोविड लॉकआऊट नंतर मंदिर उघडण्यासाठी माहितीचे संकलन, मंदिर उघडण्याची पूर्वतयारी, भक्तांसाठी आचारसंहिता, मंदिर प्रथम कसे उघडावे, मंदिर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय कसे असावे, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, मंदिरे उघडून भाविकांना दर्शनासाठी खुली करताना ही पुस्तिका मार्गदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख देवस्थाने यामध्ये सहभागी आहेत. कोविड महामारीच्या काळात देवस्थानांनी एकत्र येऊन पुढील परिस्थितीशी कशाप्रकारे सामोरे जायचे, याकरीता एकत्रिकरण महत्वाचे होते. या उपक्रमामुळे सर्व देवस्थानांचे विश्वस्त एकत्र आले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांचा या उपक्रमाकरीता पुढाकार
श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर नीरा नरसिंगपूर, स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर पावस, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर, पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे, श्री सिद्धेश्वर मंदिर सोलापूर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, श्री देवदेवेश्वर संस्थान पुणे, यमाई मंदिर औंध, भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट निगडी, मांढरदेवी देवस्थान, श्री रेवणसिद्ध मंदिर रेणावी यांसह इतरही देवस्थाने याकरीता पुढे आली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading