Wednesday, June 17, 2026
PUNE

गाववाले असल्याचे सांगत रहदारीचा रस्ता अडवला 

निवृत्त सैनिकाचे पोलीस आयुक्तांना निवेदन
पिंपरी – भारतीय सैन्यातून कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या सैनिकाच्या घराकडे जाणारा रस्ता गाववाल्यांनी अडविल्याने ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेली माती व पत्राशेड काढून टाकून रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी निवृत्त सैनिकासह नागरीकांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

याबाबत याबाबत भारतीय सैन्यातून कॅप्टन म्हणून निवृत्त झालेले सुभाष कांबळे यांच्या पत्नी विजयमाला कांबळे, शशिकांत दुधारे, राजेंद्र कांबळे, अरुण पवार, शिवाजी राजहंस, दीपक पुलेलु, तुकाराम भिमदे, भुमय्या वार, सागर जाधव यांनी पोलिस आयुक्त आणि सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून, रस्ता अडविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत भारतीय सैन्यातून कॅप्टन म्हणून निवृत्त झालेले सुभाष कांबळे यांच्या पत्नी विजयमाला कांबळे म्हणाल्या, की माझे पती सैन्यातून निवृत्त झाल्यावर शांततामय मार्गाने आमचे दैनंदिन जीवन सुरु होते. मात्र, आमचा जाण्या-येण्याचा रस्ता अडविण्यात आल्याने भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे आमच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून आमच्या मालकीचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा. तसेच नगर भूमापन अधिकाऱ्यांनी जागा मोजणीबाबत निर्णय दिल्यानंतर मोजणी आदेश येईपर्यंत आमच्या मालकी हक्काच्या जागेतील रस्त्यावरील माती व राडारोडा काढून टाकून रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणीही पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारअर्जात केली आहे. वीस वर्षाहून अधिक काळ वहिवाटीचा रस्ता असतानाही, आम्ही गाववाले आहोत, पोलिसात गेलात तर बघून घेऊ, अशी धमकी दिली जात आहे. दोन-तीन दिवसात रस्त्यावरील राडा आणि पत्रा शेड बाजूला न केल्यास पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही विजयमाला कांबळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
विजयमाला कांबळे यांनी तक्रारअर्जात म्हटले आहे, की पिंपळे गुरव येथील सर्वे नंबर 75/1अ/1क मधील 3249 चौरस फुट जागा ही आमच्या मालकीची आहे. या जागेवर आम्ही इमारत बांधली असून, दक्षिण बाजूने 15 फूट रस्ता स्वत:च्या जागेत सोडला आहे. मात्र, सर्वे नंबर 73 चे मालक किसन जगताप, शाम जगताप व राघवेंद्र जगताप आणि इतर यांनी चुकीची हद्द व वहिवाट दाखवून मोजणी करून घेतली आणि आमच्या जागेत माती टाकून रस्ता अडविला आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता थोड्या दिवसात माती काढून घेऊन रस्ता मोकळा करतो असे सांगितले. मात्र, एक वर्ष उलटूनही माती तशीच पडून आहे. उलट या रस्त्यावर आता तर पत्राशेड बांधून रस्ता पुर्णत: बंद केला आहे. याबाबत गेल्या फेब्रुवारीमध्ये संबंधितांनी केलेल्या मोजणीला हरकत घेतली. हरकत अर्जावर असता नगर भूमापन अधिकाऱ्यांनी सुनावणी घेत 27 मार्च रोजी पुनर्मोजणी करण्यात यावी, असे आदेश दिले होते. मात्र, 22 मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे मोजणी होऊ शकली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading