चळवळींचे कार्यकर्ते देशात आजही असुरक्षित – डॉ. नागनाथ कोतापल्ले
– शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशित
पुणे, दि. 1 – बुद्धिवादी आणि चळवळी करणारे कार्यकर्ते देशात कधीच सुरक्षित नव्हते. ते आजही सुरक्षित नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले आहे. शोषितांच्या बाजूने उभे राहणारे कार्यकर्ते प्रस्थापित व्यवस्थेला शत्रू वाटतात. दाभोलकर शोषितांच्या बाजूने असल्याने त्यांचा खून प्रस्थापित व्यवस्थेने केला आहे, असेही डॉ. कोतापल्ले म्हणाले.
शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेषांकाच्या प्रकाशनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात डॉ. कोतापल्ले बोलत होते. येत्या २० ऑगस्टला दाभोलकरांचा सातवा स्मृतिदिन असून दाभोलकरांचा खुन झाल्यापासून दरवर्षी ऑगस्ट महिन्यात हा विशेषांक प्रसिद्ध केला जातो.
डॉ. नागनाथ कोतापल्ले पुढे म्हणाले की, “सामान्य लोकांचे अंधश्रद्धामुळे शोषण होऊ नये यासाठी डॉ. दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी लोकांचे शोषण थांबविले. मात्र शोषितांच्या बाजूने उभे राहणारे कार्यकर्ते प्रस्थापित व्यवस्थेला शत्रू वाटतात. दाभोलकर या प्रस्थापित व्यवस्थेला शत्रू वाटल्याने त्यांचा खून करण्यात आला, मूठभर लोक बहुसंख्य लोकांच्या अज्ञानावर चैन करत असतात. लोकांना देवांच्या भाकडकथा सांगून स्वतः ऐशआराम करतात. हे मूठभर लोक प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थन करतात. त्यामुळे प्रस्थपित व्यवस्था शोषणमुक्तीचे काम करणाऱ्यांना शत्रू मानते”.
देशातील मोजक्या बुद्धीवंतांपैकी दाभोलकर एक होते. लोकांनी खरे जगावे, बुद्धीच्या आधारे निर्णय घेऊन जगावे, जादूटोणा, अंधश्रध्दावर विश्वास ठेवून दुःख ओढवून घेऊ नये, असे दाभोलकर सांगत होते, असेही डॉ. कोतापल्ले यांनी सांगितले. डॉ.नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक हा संग्राह्य असून त्यातील लेख मूलभूत प्रश्न उपस्थित करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले.
अंकाचे संपादक राजीव देशपांडे प्रास्ताविक करताना म्हणाले की, या स्मृती विशेषांकात दाभोलकर खून खटल्यातील जेष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी खटल्यातील दिरंगाई बद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहे, चार विचारवंताच्या खुनामागची सनातनी मानसिकता मुक्ता दाभोलकर यांनी उलगडून दाखवली आहे. विशेषांकात ‘खेळाचे मानसशास्त्र’ हा दाभोलकरांच्या कबड्डी या दुर्मिळ पुस्तकातील लेख आहे. डॉक्टर हे राष्ट्रीय पातळीवर कबडीपटू होते. या लेखातून दाभोलकरांचे पट्टीचे खेळाडू ते विवेकवादी कार्यकर्ता असे दर्शन होईल. दाभोलकरांच्या अविस्मरणीय आठवणी अंनिसच्या सात कार्यकर्त्यांनी या अंकात जागवल्या आहेत. अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ.राम पुनियानी, किशोर दरक, सुभाष थोरात, श्याम गायकवाड, अनिल चव्हाण यांच्या वाचनीय लेखांचा समावेश या अंकात आहेत. अंकाचे प्रकाशक राहुल थोरात म्हणाले की, हा ई अंक पीडीएफ स्वरूपातील दाभोलकर विशेषांक सर्वांना मोफत पाठवला जाणार आहे. सोशल मीडियातून या अंकाचा प्रचार प्रसार केले मुळे हा तरूण पिढी पर्यंत जाईल.