कोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण
पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी, सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश; शासन निर्णय जारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई, दि. २९ :- कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधीत कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५० लाख रुपयांचं विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्यं बजावणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात म्हणाले की, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचं सर्व्हेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबादाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करुन कर्तव्यं बजावत आहे. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत राज्य शासन गंभीर असून त्यादृष्टीनं आज हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आला आहे. आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या केंद्रीय योजनेचा लाभ आधीपासून मिळत आला आहे. आजच्या शासन निर्णयानुसार, कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, बाह्यसेवेद्वारे घेतलेले, मानसेवी व तदर्थ असे सर्वं कर्मचारी) अशा सर्वं घटकांना ५० लाख रुपयांच्या विमासंरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ही योजना विमा कंपनीच्या सहकार्यानं राबविण्यात येणार असली तरी यासंदर्भातील पॅकेज अंतिम होईपर्यंत, अंतरिम निर्णय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून हे ५० लाखांचे सानुग्रह अनुदान संबंधीताना देण्यात येणार आहे. या संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी, संबंधीत कर्मचारी कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा दुर्दैवाने मृत्यू होण्यापूर्वीच्या चौदा दिवसांच्या कालावधीत कर्तव्यावर हजर असणे व जिल्हाधिकारी किंवा पदनिर्देशित विभागप्रमुखांनी ते प्रमाणित करणे अनिवार्य आहे.
यापूर्वी लागू केलेल्या किंवा भविष्यात लागू होणाऱ्या योजनेंतर्गत अशा लाभास पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू असणार नाही. अशाच प्रकारची योजना स्थानिक स्वराज संस्था आणि राज्य शासकीय सार्वजनिक उपक्रमांकडून देखील राबविण्यात येणार आहे. ही योजना तूर्तास ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू असेल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to email a link to a friend (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)