Saturday, October 3, 2026
Latest NewsPUNE

१७ ऑगस्टला देशभरात भारतीय मजदूर संघाचे आंदोलन; कंत्राटी कामगारांचा मोठा सहभाग अपेक्षित


पुणे : कामगारांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संघटित, असंघटित तसेच ठेका व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

ठेका व कंत्राटी कामगारांना किमान ३० हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे, वर्षानुवर्षे एकाच आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांना रोजगाराची सुरक्षितता मिळावी आणि पीएफ, ईएसआय, बोनस तसेच अन्य वैधानिक लाभ नियमितपणे मिळावेत, अशी संघाची प्रमुख मागणी आहे. मनमानी सेवा समाप्ती, वेतन कपात व विलंबाने वेतन देण्याच्या प्रकारांना आळा घालून श्रम कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय ईएसआयची वेतन मर्यादा २१ हजारांवरून ४२ हजार रुपये, तर ईपीएफची मर्यादा १५ हजारांवरून ३० हजार रुपये करण्याची मागणी आहे. ईपीएफअंतर्गत किमान पेन्शन १ हजारांवरून ७ हजार ५०० रुपये करण्याबरोबरच बोनससाठीची वेतन मर्यादाही ४२ हजार रुपये करण्याची मागणी संघाने केली आहे.
श्रम संहितेतील कामगारहिताला बाधक तरतुदींचा पुनर्विचार करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणीही भारतीय मजदूर संघाने केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांतील कामगारांनी, विशेषतः ठेका व कंत्राटी कामगारांनी १७ ऑगस्टच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात आणि अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading