Friday, October 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘भिऊ नका’ संदेश कुणासाठी? बंडखोर खासदारांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या खासदारांची भेट घेत त्यांना ‘काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे’, असे आश्वासन दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.

न्यायालयात संबंधित प्रकरणांची सुनावणी सुरू असताना पंतप्रधानांनी फुटीर खासदारांची भेट घेण्याची गरज काय होती, असा सवाल ठाकरे यांनी केला. या भेटीतून नेमका कोणाला संदेश द्यायचा होता, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तो सर्वोच्च न्यायालयासाठी होता की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी, अशी विचारणा केली.
मोदी यांनी बंडखोर खासदारांना दिलेल्या कथित ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ या आश्वासनावरही ठाकरेंनी उपरोधिक टीका केली. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा संदेश स्वामी समर्थांशी जोडला जातो. आता मोदी नवे स्वामी झाले आहेत का, असा टोला त्यांनी लगावला.

आंदोलन करणारे विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक यांना भेटण्याऐवजी मोदी फुटीर खासदारांची भेट घेत असल्याचे सांगत ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. कोविड काळात आपण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होतो, त्यावरून आपल्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आता तरुणांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. ‘इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे का?’ असा सवाल त्यांनी केला.
बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वक्तव्य बाहेर कसे आले, यावरही ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे एकनाथ शिंदे दबावात असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांना धीर देण्यासाठी हा संदेश देण्यात आला का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ हा संदेश नेमका कुणासाठी होता, असा सवाल करत ठाकरे यांनी न्यायालय, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणाला मोदींना काही संदेश द्यायचा होता का, हे स्पष्ट करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading