Saturday, October 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एल निनोचा प्रभाव कमी करण्यास सकारात्मक आयओडीची साथ; २० ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुणे  : एल निनोमुळे यंदा महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, आता सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सक्रिय होत असल्याने मान्सूनला बळ मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, आयओडीचा सकारात्मक प्रभाव कायम राहिल्यास मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात एल निनोचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

मात्र, यासाठी वातावरणातील इतर अनुकूल घटक आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालींची साथ मिळणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सध्या हिंदी महासागरात सकारात्मक आयओडी विकसित होत असून त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या पावसाचा चांगला लाभ झाला. सध्या मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे व रायगडच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरच्या घाट परिसरांसह विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकच्या घाट भागातही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही भागांमध्ये अद्यापही पावसाची तूट कायम असली तरी गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील, तर २० ऑगस्टनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading