Saturday, October 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल; वैशाली नागवडे महिला प्रदेशाध्यक्ष, निखिल ठाकरे युवक प्रदेशाध्यक्ष

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) राज्यातील संघटनात्मक बळकटीसाठी दोन महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. वैशाली नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी, तर निखिल ठाकरे यांची युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोघांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
महिला प्रदेशाध्यक्षपद हे भोंदू बाबा प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याने जवळपास चार महिन्यांपासून रिक्त होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. अखेर पक्षाने वैशाली नागवडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.

वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या असून त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. दौंड तालुक्यातील सक्रिय नेत्या म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूकही लढवली आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नागवडे यांनी ही जबाबदारी पक्षाच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून काम करण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्यभर महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी वैशाली नागवडे यांनी काँग्रेसवरही टीका करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवर आक्षेप नोंदवला. एकीकडे बारामती विधानसभा निवडणुकीत मदत केल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक होते. राजकीय मतभेद असले तरी जबाबदारीने भाष्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या निखिल ठाकरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्हा प्रभारी म्हणून काम केले आहे. राज्यातील तरुणांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि पक्षाची भूमिका युवकांपर्यंत पोहोचवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading