दीप-ज्योती आणि जय-शरूच्या नात्यांमध्ये होणार मोठे बदल
झी मराठीच्या दोन लोकप्रिय मालिका ‘दीपज्योती’ आणि ‘सनई चौघडे’ प्रेक्षकांना नव्या भावनिक प्रवासावर घेऊन जात आहेत. येत्या आठवड्यात या दोन्ही मालिकांमध्ये नात्यांचे बदलते समीकरण, विश्वासाची परीक्षा, आणि नव्या नात्यांची सुरुवात अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला दीप, ज्योती आणि स्वराज यांच्या नात्यात नवे वळण येत असताना, दुसऱ्या बाजूला जय आणि शरू यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ होताना दिसणार आहे.
‘दीपज्योती’मध्ये गैरसमजांच्या सावटातून नात्यांना मिळणार नवी दिशा. ज्योतीच्या आयुष्यात उभ्या राहिलेल्या संकटाच्या काळात दीप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. प्रभूच्या माणसांपासून तिचे संरक्षण करण्याबरोबरच तिच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपये घेतो. मात्र, याच घटनेने गैरसमज निर्माण होऊन प्रीती, दीप आणि स्वराज यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रीतीची हा प्लॅन काही काळ यशस्वी होताना दिसत असला तरी अनपेक्षितपणे ज्योतीचं दीप आणि स्वराज यांच्यातील गैरसमज दूर करण्यात कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे तिघांच्या नात्यांमध्ये एक वेगळ वळण येणार आहे. दीपच्या निःस्वार्थ पाठिंब्यामुळे ज्योतीचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ होत असला, तरी भूतकाळातील घटनांमुळे तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न कायम आहेत. या संघर्षातून पुढे त्यांच्या नात्याला कोणती दिशा मिळणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.
‘सनई चौघडे’मध्ये विश्वासाच्या नात्याला नवा अर्थ मिळणार आहे. ऑफिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टीम-बिल्डिंग उपक्रमामुळे अनेक सहकाऱ्यांमधील नात्यांना नवी दिशा मिळणार आहे. विश्वासावर आधारित विविध खेळांमधून जय आणि शरू पुन्हा एकदा एकमेकांवर असलेला त्यांचा विश्वास सिद्ध करणार आहेत. या अनुभवामुळे त्यांच्या नात्यातील अंतर आणखी कमी होताना दिसेल. ऑफिसमधील या वातावरणात सर्वजण एकमेकांशी सहज मिसळत असताना जय मात्र नेहमीप्रमाणे एकटाच आहे, त्याच्या कडक स्वभावामुळे कोणीही त्याच्याशी सहज मैत्री करण्याचे धाडस करत नाही. अशा वेळी शरू त्याच्यासाठी खास भेटवस्तू घेऊन येते आणि त्याच्याशी मनापासून मैत्रीचा हात पुढे करते. जयसाठी हा अनुभव पूर्णपणे अनपेक्षित आहे. तो आपल्या भावना व्यक्त करत नसला, तरी शरूच्या या कृतीने तो मनापासून भारावून जातो. याचदरम्यान तेजस्विनी, शरूला मिसेस चौधरी यांच्यासोबतच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी बाहेर घेऊन जाते. मात्र, त्या भेटीत शरूचा अपमान होतो आणि ती खचून जाते. अशा कठीण प्रसंगी जय तिची समजूत काढत तिचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रसंगामुळे जय आणि शरू यांच्यातील विश्वास आणि जवळीक आणखी वाढणार का ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
भावनांनी परिपूर्ण, विश्वासाची नवी व्याख्या सांगणारे आणि नात्यांचे बदलते रंग उलगडणारे हे विशेष भाग पाहायला विसरू नका, ‘दीपज्योती’ दररोज रात्री ८ वा. आणि ‘सनई चौघडे’ दररोज रात्री ८.३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
