Monday, October 12, 2026
Latest NewsPUNE

अमनोरा येस फाउंडेशनच्या वतीने सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळा क्रीडा संकुलाची उभारणी

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहन भागवत यांच्या हस्ते 8 ऑगस्ट रोजी उद्घाटन

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत अमनोरा येस फाउंडेशनने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळेचे पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि बंदिस्त प्रेक्षागृह उभारले आहे. या भव्य क्रीडा संकुलाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असल्याची माहिती अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विवेक कुलकर्णी उपस्थित होते.

या आश्रम शाळेची स्थापना परमपूज्य भय्यूजी महाराज यांनी केली होती. त्यानंतर अमनोरा येस फाउंडेशन यांनी २०१४ मध्ये शाळेची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी यासाठी फाउंडेशनने शाळेत व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि बास्केटबॉलची स्वतंत्र मैदाने तसेच सुसज्ज बंदिस्त प्रेक्षागृह उभारले आहे.

खामगाव येथील या आश्रम शाळेत सध्या पारधी समाजातील सुमारे ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत या उद्देशाने इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, मोटर मेकॅनिक आणि ब्युटी पार्लर या व्यावसायिक अभ्यासक्रमांचीही सुरुवात करण्यात आली आहे.

फाउंडेशनच्या ‘स्वयंसिद्ध’ उपक्रमांतर्गत जुन्या साड्यांपासून विद्यार्थिनींकडून आकर्षक कापडी पिशव्या तयार करून घेतल्या जातात. प्रत्येक पिशवीमागे विद्यार्थिनींना २५ रुपये मानधन दिले जाते. या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यात १० हजार रुपये जमा करण्यात आले असून, ही रक्कम ८ ऑगस्ट रोजी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली.

अमनोरा येस फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. ग्रामीण भागातील गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबरोबरच अनेक विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक आधार देण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीमुळे रिक्षाचालकाची मुलगी डॉक्टर, अंगणवाडी सेविकेची मुलगी आयटी अभियंता, तर भाजी विक्रेत्याची मुलगी शासकीय अधिकारी बनल्याची उदाहरणे आहेत. तसेच नर्सिंगच्या ४० विद्यार्थिनींना ११ लाख रुपयांची ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’ देण्यात आली असून, ससून रुग्णालयातील मावश्या आणि ताईंना गेल्या आठ वर्षांपासून ‘मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार’ प्रदान केला जात असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading