Monday, October 12, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

गुन्ह्यांच्या तपासासाठी सक्षम तपास कार्यप्रणालीची गरज; सायबर गुन्हेगारी तपास यंत्रणेतील तज्ञांचे मत

 

पुणे : तंत्रज्ञान ज्याप्रमाणे बदलत आहे त्याप्रमाणे गुन्ह्यांची व्याप्ती आणि प्रकार बदलत आहेत. पारंपारिक पद्धतीने गुन्हे होण्याऐवजी आता घरबसल्या स्मार्टफोन वापरून फसवणुकीपासून ते देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल इतके गंभीर गुन्हे होत आहेत. त्यामध्ये केवळ साधन म्हणून स्मार्टफोनचा वापर केला जातो. अशावेळी जेव्हा गुन्हा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, तेव्हा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे आहे. डिजिटल गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर साक्षरता ही गरजेची आहे, असे मत सायबर गुन्हेगारी तपास यंत्रणेतील तज्ञांनी व्यक्त केले.
ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान विभाग – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने पुणे विद्यापीठाच्या जिऑलॉजी विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास’ सायबर सुरक्षा संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सायबर क्षेत्रातील गुन्हेगारी तपास यंत्रणांमधील तज्ञांनी सायबर आणि डिजिटल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक तंत्रांची माहिती दिली. ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख डॉ. केतन अत्रे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोनल कामल म्हणाल्या, डिजिटल स्वरूपामध्ये गुन्हा घडल्यानंतर ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता कामा नये. त्या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटर, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्हपासून ते विविध प्रकारच्या वायर, राउटर यांच्यापर्यंत विविध मशीन योग्य प्रकारे हस्तगत करणे गरजेचे आहे. ज्यावेळी कॉम्प्युटर जप्त करण्यात आला आहे, तो कॉम्प्युटर जसाच्या तसा तपासासाठी हस्तगत करणे गरजेचे आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली तर तपास करताना अडथळे निर्माण होऊ शकतात.
युगल पाठक म्हणाले, गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेले मोबाईल फोन हस्तगत केल्यानंतर अली टूल , एडीबी , प्लॅटफॉर्म टूल अशा प्रकारच्या टूल्सचा वापर करून मोबाईल हिस्टरी जाणून घेता येते. मोबाईल हस्तगत केल्यानंतर तो पूर्णतः नेटवर्क फ्री करण्यासाठी तो ॲल्युमिनियम फाईलमध्ये गुंडाळला जाणे गरजेचे आहे, तरच तो मोबाईल कोणत्याही नेटवर्कमध्ये येऊ शकत नाही आणि त्यामध्ये पुन्हा छेडछाड करणे शक्य होणार नाही.
दिल्ली पोलिसांच्या क्राईम विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. दृष्टी भूपतानी यांनी गुन्हेगारी घटनास्थळ तपासणी (Crime Scene Investigation) विषयावर अत्यंत प्रभावी व प्रात्यक्षिक सत्र घेतले. त्यांनी प्रत्यक्ष गुन्हेगारी घटनास्थळाची निर्मिती करून शस्त्रे व इतर पुरावे दाखवत पुरावे ओळखणे, संकलित करणे व जतन करण्याच्या शास्त्रीय पद्धतींचे मार्गदर्शन केले. हे सत्र सहभागींसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व उत्स्फूर्त ठरले.

सीमा सुरक्षा दल (BSF), गृह मंत्रालय (MHA) येथील सेकंड-इन-कमांड श्री. संजय शर्मा यांनी दहशतवादी वित्तपुरवठा (Counter Terror Financing) व मनी लॉन्डरिंग प्रतिबंध (Anti-Money Laundering) या विषयावर अत्यंत प्रभावी व संवादात्मक सत्र घेतले. दहशतवादी संघटनांच्या आर्थिक जाळ्याची कार्यपद्धती, निधीचा मागोवा घेण्याच्या पद्धती आणि तपासातील महत्त्वाच्या बाबी त्यांनी उदाहरणांसह उलगडून सांगितल्या. हे सत्र सहभागींसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, रंजक आणि प्रेरणादायी ठरले.
संजय शर्मा यांनी टेररिस्ट फायनान्सिंग अँड मनी लॉन्ड्रीग, उदित शर्मा यांनी इन्वेस्टीगेटिंग सायबर क्राईम्स , फलिंदर डी एम यांनी इन्वेस्टीगेटिव्ह फिंगरप्रिंट अँड हॅन्ड रायटिंग डॉक्युमेंट्स या संदर्भात या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading