खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकर दाम्पत्य बेपत्ता; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव
पुणे प्रतिनिधी : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर हे बेपत्ता असून धंगेकर यांच्या निवासस्थानी कुलूप आहे. त्यांचा मोबाईल फोनही बंद आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, अटकेची शक्यता लक्षात घेऊन धंगेकर दाम्पत्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. धंगेकर यांनी यापूर्वी आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला होता.
बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार केला होता. तसेच त्यांची आत्महत्या पूर्वीची चिठ्ठीही सापडली आहे. आर्थिक व्यवहार, थकीत रक्कम आणि कथित मानसिक त्रासाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्यांच्या पत्नी सुलताना यांच्या तक्रारीच्या आधारे धंगेकर दाम्पत्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, धंगेकर दाम्पत्याला या प्रकरणात विनाकारण गोवले जात असल्याचा दावा त्यांचे वकील अॅड. विजय ठोंबरे यांनी केला आहे. संबंधित बांधकाम प्रकल्पातून धंगेकर दाम्पत्य वर्षभरापूर्वीच बाहेर पडले असून, कंत्राटदाराच्या थकीत रकमेबाबत त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यान सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात येतील, असेही ठोंबरे यांनी सांगितले.
