Monday, July 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

… म्हणून सोनम वांगचुक यांना पुढे करून विरोधकांकडून गोंधळ

 

खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांवर पलटवार

मुंबई/नवी दिल्ली

मोदी सरकारच्या प्रदीर्घ कार्यकाळात सरकारवर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप करता आले नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यासाठीच त्यांनी सोनम वांगचुक यांना पुढे करून सगळा गोंधळ घातला आहे, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर केला.

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री हेमंत प्रधान यांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यासाठी उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणाच्या 21व्या दिवशी उपोषणस्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले. त्यावरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशा शब्दात शिंदे यांनी पोलिसांच्या कृतीचे समर्थन केले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. पेपर फुटीची अनेक प्रकरणे उघडकीला आली. मोदी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधकांना करता आला नाही. त्यामुळेच नीट पेपरफुटीचे प्रकरण आणि सोनम वांगचुक यांना पुढे करून विरोधकांचे सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला.

मतदार संघ पुनर्रचना विधेयक या अधिवेशनात मानले जाणार का, याबाबत विचारणा केली असता शिंदे म्हणाले की, या विधेयकाबाबत सविस्तरपणे चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. या विधेयकात काही बदल करण्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच सूचित केले आहे. त्यानुसार चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद आणखी वाढली असून शिवसेना शिंदे गटही प्रबळ होत आहे. आमच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. आमच्या सर्वच खासदारांना संसदेत बोलण्याची संधी मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात आलेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला शनिवारी लोकसभा अध्यक्षांकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, हा तांत्रिक विषय आहे. अध्यक्षांनी सर्व विचार करूनच हा निर्णय घेतला असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading