डॉक्टर संघटनेचा राज्यव्यापी संप स्थगित; उच्च न्यायालयाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
पुणे प्रतिनिधी : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) महाराष्ट्र शाखेने सोमवारी पुकारलेला २४ तासांचा राज्यव्यापी आरोग्यसेवा बंदचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संघटनेने हा निर्णय घेतला.
या संपामुळे राज्यातील बाह्यरुग्ण विभागांसह विविध आरोग्यसेवा ठप्प होण्याची शक्यता होती. त्यामुळे संप स्थगित झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डोंबिवलीतील घटनेनंतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे आरोग्यसेवा देणे कठीण होत असल्याचे IMAने म्हटले होते. डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा प्रकरणांची जलदगतीने सुनावणी करून दोषींना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी संघटनेने केली होती.
मात्र, रुग्णसेवेचा व्यापक विचार करून उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याचे आवाहन केले. या आवाहनाचा मान राखत IMA महाराष्ट्र शाखेने प्रस्तावित संप स्थगित केला असून, राज्यातील आरोग्यसेवा सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
