केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; सिया-चेतनने शोधला होता कॉन्ट्रॅक्ट किलर
पुणे प्रतिनिधी : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागल्याचे समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनच्या हत्येचा कट काही महिन्यांपासून आखल्याचा संशय असून, त्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, केतनला हळूहळू भिनणारे विष देऊन ठार करण्याच्या शक्यतेचाही दोघांनी विचार केला होता. एवढेच नव्हे, तर केतनची हत्या करण्यासाठी व्यावसायिक मारेकऱ्याचा शोध घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, सिया आणि चेतन यांनी एका मारेकऱ्याची भेट घेतली होती. त्याने सुरुवातीला केतनच्या हत्येची सुपारी स्वीकारल्याचे सांगितले. मात्र, केतन अग्रवाल कोण आहे आणि पुण्यातील त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे, याची माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने ऐनवेळी हत्या करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
या प्रकरणातील प्रत्येक दाव्याची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
