Friday, July 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोफत साडी योजना बंद केल्यावरून रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘लाडक्या बहिणींसाठी एक साडीही परवडत नाही का?’

 

मुंबई : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांसाठी राबविण्यात येणारी मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांसाठी अनेक आश्वासने दिली; मात्र आता आर्थिक अडचणींचे कारण पुढे करून एकामागून एक योजना बंद केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे साहेब, २१०० आणि १५०० रुपये सोडा, आता लाडक्या बहिणींसाठी एक साडी देणेही परवडत नाही का?’ असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला.

महिलांच्या नावावर राजकारण करून निवडणुकीनंतर त्यांच्यासाठीच्या योजनांमध्ये कपात करणे हा महिलांचा विश्वासघात असल्याचे खडसे यांनी म्हटले. राज्याची आर्थिक स्थिती इतकीच बिकट होती, तर निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने कोणत्या आधारावर देण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांतील महिलांना दिवाळीच्या काळात साडी उपलब्ध करून देणे तसेच वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देणे हा होता. या योजनेंतर्गत राज्यातील सुमारे २५ लाख गरीब कुटुंबांना दरवर्षी साड्यांचे वाटप केले जात होते. त्यासाठी सरकारकडून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत होती. २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

मात्र, वस्त्रोद्योग विभागाने यंदा ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी दिवाळीत सुमारे २५ लाख गरीब कुटुंबांतील महिलांना सरकारी योजनेअंतर्गत साडी मिळणार नाही.

सरकारने महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि विविध कल्याणकारी योजनांच्या भवितव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading