देशभरातील आयआयटी, आयआयएम आणि एनआयटींमध्ये व्यापक जनजागृती मोहिमेनंतर वंदे भारतमला उत्स्फूर्त प्रारंभिक प्रतिसाद
अहमदाबाद : भारतातील पुढील पिढीतील नवनिर्माते, उद्योजक आणि परिवर्तनकर्त्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी गौतम अदानी यांनी वंदे भारतम उपक्रम सुरू केला. देशातील आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि अन्य अग्रगण्य विद्यापीठांसह प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये राबविण्यात आलेल्या व्यापक जनजागृती कार्यक्रमानंतर या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने अर्ज प्राप्त होत आहेत. आठ शहरांतील 48 कॅम्पसमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेद्वारे हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यातून भारतातील युवकांमध्ये वाढत असलेली उद्योजकतेची भावना आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रभावी उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची त्यांची उत्सुकता अधोरेखित झाली आहे. या जनजागृती मोहिमेद्वारे 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत भेट दिलेल्या कॅम्पसमधील 50,000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आले असून या उपक्रमाबाबत प्रत्यक्ष पातळीवर निर्माण झालेल्या प्रचंड उत्सुकतेचे हे द्योतक आहे.
उद्योजकीय आकांक्षांना आकार देण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणजे शैक्षणिक संस्था असल्याची जाणीव ठेवून वंदे भारतम युवा नवनिर्मात्यांना मार्गदर्शन, उद्योग क्षेत्राचा अनुभव आणि त्यांच्या प्रगतीला चालना देणाऱ्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. ही संकल्पना थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमांतर्गत विविध कॅम्पसमध्ये प्रत्यक्ष जनसंपर्क उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ब्रँडेड एलईडी व्हॅन्स, प्रवर्तकांमार्फत संवाद, दृकश्राव्य सादरीकरणे तसेच क्यूआर-आधारित नोंदणी सुविधा यांचा समावेश होता. अलिकडच्या काही महिन्यांतील कॅम्पस स्तरावरील सर्वाधिक नोंदणी झालेल्या उद्योजकता कार्यक्रमांपैकी वंदे भारतम हा एक उपक्रम म्हणून उदयास आला असून, भेट दिलेल्या जवळपास प्रत्येक कॅम्पसमधून अर्ज प्राप्त झाले आहेत. या जनजागृती मोहिमेमुळे वंदे भारतमबाबत व्यापक जागरूकता निर्माण झाली असून विद्यार्थी थेट आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये नोंदणी करत आहेत.
या प्रतिसादाबाबत बोलताना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, “जिथे कल्पनांची कसोटी लागते, आत्मविश्वास घडतो आणि महत्त्वाकांक्षांना दिशा मिळते अशा जागा म्हणजे शैक्षणिक संस्था. तरुणांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी, निर्भयपणे नवकल्पना विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पना खरोखरच बदल घडवू शकतात यावर विश्वास ठेवण्यासाठी येथे सर्वोत्तम वातावरण असते. वंदे भारतमच्या माध्यमातून विद्यार्थी, उद्योजक किंवा व्यावसायिक अशा प्रत्येक नवनिर्मात्याला शिकण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनांचे अर्थपूर्ण उपायांमध्ये रूपांतर करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे आणि देशभरातील आणखी अनेक होतकरू, उदयोन्मुख नवनिर्माते या प्रवासाचा भाग बनण्यासाठी पुढे येतील अशी मला आशा आहे.”
आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांमधून भारताच्या नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील वैविध्य स्पष्टपणे दिसून येते. विविध पार्श्वभूमीतील तसेच नाविन्यपूर्णतेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या सहभागींचा त्यात समावेश आहे. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण, शाश्वत विकास, उत्पादन, किरकोळ व्यापार आणि ग्राहकाभिमुख उपाययोजना अशा विविध क्षेत्रांतील प्रस्ताव प्राप्त झाले असून देशभरातून उदयास येत असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांची व्यापकता त्यातून अधोरेखित होते.
नाविन्यपूर्ण कल्पना, प्रोटोटाइप्स, प्रारंभिक टप्प्यातील उपक्रम तसेच प्रस्थापित व्यवसाय असलेल्या व्यक्तींसाठी खुला असलेला वंदे भारतम उपक्रम निवड झालेल्या सहभागींसाठी मार्गदर्शन, इन्क्युबेशन सहाय्य आणि उद्योग क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींशी संवाद साधण्याच्या संधी उपलब्ध करून देतो. निवड झालेल्या सहभागींची पुढे अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. तेथे त्यांना त्यांच्या कल्पनांमध्ये अधिक सुधारणा करण्याची तसेच मान्यवर परीक्षक मंडळासमोर त्या सादर करण्याची संधी मिळेल. या प्रक्रियेद्वारे आशादायी कल्पनांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत भारताची नाविन्यपूर्ण आणि उद्योजकता परिसंस्था अधिक सक्षम करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
