Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

मंडई म्हसोबा उत्सवात यंदा विविधांगी कार्यक्रमांची पर्वणी

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे यंदा दि. १० ते १४ आॅगस्ट २०२६ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवनाद नृत्य महोत्सव, वेबकॉन पुणे श्री २०२६ ही जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा, तब्बल ११०० दिव्यांचा भव्य दीपोत्सव, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य प्रदान, महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अशा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे., अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, राजेंद्र नांगरे, जतिन पांडे, सारिका निंबाळकर, करिष्मा शेख उपस्थित होते.

निवृत्ती जाधव म्हणाले, उत्सवाचा प्रारंभ सोमवार, दि.१० आॅगस्ट रोजी होणार असून सकाळी धार्मिक कार्यक्रम व सायं.५ वाजता शिवनाद नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील प्रख्यात कलाकार शास्त्रीय नृत्याची अभिजात कला सादर करणार आहेत. तसेच यावेळी नृत्य वैभव पुरस्कार सुप्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर, युवा नृत्य वैभव पुरस्कार कथकमध्ये मनीषा नृत्यालयाच्या वल्लरी आपटे, भरतनाट्यम मध्ये स्वरदा नृत्य संस्थेच्या स्वरदा भावे, ओडिसी प्रकारात आकांक्षा ओडिसी नृत्यालयाच्या रसिका गुमास्ते, सत्रिय प्रकारात आदी स्कूल आॅफ डान्सच्या डॉ.देविका बोरठाकूर आणि भरतनाट्यममध्ये नटरंग अकॅडमीच्या प्रणव कडेकर यांना प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध असून ९७६३६८९१९०, ९८५०९१९०४७, ९९६०७७३१३१ पुणेकरांनी संपर्क साधावा.

मंगळवार, दि. ११ आॅगस्ट रोजी सायं. ५ वाजता महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने तसेच पिंपरी चिंचवड शरीर सौष्ठव संघटना व बॉडी बिल्डिंग अ‍ँड फिजिक्स स्पोर्टस् पुणे यांच्या सहकार्याने वेबकॉन पुणे श्री २०२६ ही ७ वजनी गटातील जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. यामध्ये तब्बल ३ लाख १३ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. बुधवार, दि. १२ आॅगस्ट रोजी सायं.७ वाजता दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव व महाआरती होणार आहे. यावेळी कालीपुत्र कालीचरण महाराज व श्री क्षेत्र दत्तधाम पीठ गंगापूर नाशिकचे योगतपस्वी प.पू. दत्तदासजी महाराज उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार, दि.१३ आॅगस्ट रोजी सायं. ७ वाजता सुमारे १ हजार गरजू विद्यार्थ्यांना एकूण २ लाख ५१ हजार रुपयांच्या वह्या व शालेय साहित्य प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि. १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा व चालता बोलता हा कार्यक्रम होणार असून १४ लकी ड्रॉ होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागासाठी मो. ७०७१७२९४९४, ७०७१७२९८९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर, उत्सवाची सांगता महाआरतीने होणार असून सायं. ७ वाजता सद््गुरु बाळूमामा देवालय आदमापूरचे मुख्य भाकनूककार प.पू.कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे) यांच्या हस्ते होईल.

वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading