Friday, October 16, 2026
Latest NewsPUNE

ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी

 

 

शैला मुकुंद आठवले यांना देण्यात येणार यंदाचा प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार

पुणे  : सुप्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव या दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव दिनांक १४ व १५ जुलै, संध्याकाळी ५ ते ८ या दरम्यान टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सृजन फाउंडेशनचे अधिष पायगुडे यांनी कळवली आहे. महोत्सवाचे हे सलग १५ वे वर्ष असून महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे व अभिषेक काळे नाट्यसंगीत सादर करतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात दिपीका भिडे भागवत यांचा शास्त्रीय गायनाने होणार असून त्यानंतर सुप्रसिद्ध सरोद वादक अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन होईल. महोत्सवाची सांगता पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने होईल.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध निवेदिका व लेखिका शैला मुकुंद आठवले यांना प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रुपये दहा हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे सलग तिसरे वर्ष असून याआधी हा पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि सुप्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका मंगला खाडिलकर यांना देण्यात आला आहे.

महोत्सवात उदय कुलकर्णी (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भारत कामत (तबला), अभिषेक रवांदे (हार्मोनियम), यती भागवत (तबला), रोहित मुजुमदार (तबला), सुनील जायफळकर (तबला) आदी सहकलाकारांचा सहभाग असेल. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे करणार आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading