मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर तातडीचा निर्णय; मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय तांत्रिक समिती गठित
मुंबई, दि. १३ जुलै : मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वरिष्ठ अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि आमदार महेश लांडगे यांनी तातडीची बैठक घेऊन संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेतला होता. या बैठकीत दुर्घटनेची निष्पक्ष, सखोल आणि तांत्रिक चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने राज्य शासनाने आज उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी समिती गठित करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), आयआयटी मुंबईचे भू-तांत्रिक तज्ज्ञ तसेच पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.
समिती दुर्घटनेची तात्काळ कारणे (Immediate Cause) आणि मूळ कारणे (Root Cause Analysis) शोधून काढणार असून, SLF ची स्थिरता, तांत्रिक बाबी, सुरक्षा मानके, प्रशासकीय जबाबदारी, कंत्राटदार व संबंधित यंत्रणांची भूमिका, तसेच लागू नियमांचे पालन झाले की नाही याची सखोल चौकशी करणार आहे.
याशिवाय, दुर्घटनेपूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारी, सूचना, ई-मेल, व्हॉट्सअॅप संदेश, सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन सर्व्हे आणि इतर नोंदींची तपासणी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास शिस्तभंग तसेच फौजदारी कारवाईबाबतही समिती शासनाला शिफारस करणार आहे.
समितीने एका महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल आणि दोन महिन्यांच्या आत अंतिम अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे.
