Wednesday, July 15, 2026
Latest NewsPUNE

हा तर युवापिढीने केलेला सन्मान; प्रसिद्ध निवेदिका शैला मुकुंद यांची भावना

 


पुणे : आपण आतापर्यंत केलेल्या कामाची दखल युवा पिढीने घेतली असून आपल्याला मिळालेला सन्मान हा त्याचीच पावती असल्याची भावना प्रसिद्ध निवेदिका -लेखिका शैला मुकुंद यांनी मंगळवारी व्यक्त केली. सृजन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ज्योस्त्ना भोळे स्वरोत्सवामध्ये शैला मुकुंद यांना प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, जेष्ठ गायक शौनक अभिषेकी, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. बाळकृष्ण परांजपे, ज्योस्त्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष अधिश पायगुडे, उपाध्यक्ष पोपटलाल शिंगवी, आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी प्रकाश धोका यांच्या चंद्रप्रकाश फाउंडेशनतर्फे चिन्मय कुलकर्णी (गायक) आणि गायक प्रकाश माळी (तबलावादकयांना प्रत्येकी रुपये १५०० इतकी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रकाश पायगुडे यांच्याबरोबर आपण भरपूर काम केले. मुलाखत घेताना सहजसंवाद साधण्याची उत्तम कला प्रकाश यांच्याकडे होती. उत्तम संघटक, संयोजक, सुस्वभावी हे गुण त्यांच्या स्वभावात होते. आपल्याला हा पुरस्कार ज्योस्त्ना भोळे यांच्या नावाने होत असणाऱ्या महोत्सवात मिळत असल्याचे आपल्याला अप्रूप असल्याचे शैला मुकुंद यावेळी म्हणाल्या. 

मुंबई सोडून आपण पुण्यात आलो त्यानंतर इथे कामे सुरु झाली तेव्हा पुणेकरांनी त्याला चांगली दाद दिली. मला कायम संधी मिळत गेली तिचा स्वीकार करून आपण काम करत गेलो. रसिकांनी प्रोत्साहन दिले त्यामुळे आपल्या हातून हे काम घडत गेले. विशेष म्हणजे आतापर्यंत केलेल्या कामाची युवापिढीने दखल घेतली त्यामुळे आपल्याला दिलेला हा पुरस्कार तरुण पिढीने दिलेला असल्याचे शैला मुकुंद यावेळी म्हणाल्या. 

प्रकाश पायगुडे आणि आपला पाच दशकांचा संबंध राहिला. प्रकाश यांनी स्वतःच्या कर्तृत्व सिद्ध करत उत्तम काम केले. क्रीडा वार्ताहर, उत्तम समालोचक म्हणून त्याची ख्याती होती. आपल्या समोर असणाऱ्या व्यक्तीला सहज बोलते करण्याची कला त्याला चांगली अवगत होती. आजच्या काळात थोडे काम केले की अधिक केले असे दाखवण्याची स्पर्धा आज निर्माण झाली आहे. शैला मुकुंद यांनी आतापर्यंत खूप काम केले. मात्र, त्याचा कधीच देखावा केला नाही. तरुण पिढीला त्याची प्रेरणा अधिक भावली असल्याचे उल्हास पवार यावेळी म्हणाले. अधिश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. रविंद्र खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading