Saturday, August 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे, फडणवीस २०२९ पर्यंतच मुख्यमंत्री राहतील – रामदास आठवले 

पुणे | प्रतिनिधी

‘ऑपरेशन टायगर’ ही भारतीय जनता पक्ष किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलेली राजकीय घडामोड नसून, ती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयांचे फलित आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख नेते असून, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळेच इतर पक्षांतील नेते व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिपाल वाघमारे, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप, ॲड. मंदार जोशी, शाम सदाफुले, विरेन साठे, बसवराज गायकवाड, अण्णा वायदंडे, शशिकला वाघमारे, संघमित्रा गायकवाड, जयदेव रंधवे, क्रिस्टोपर राजमनी, थॉमस मॅडम, रेश्मा शेख, मिलाज मेमन, अरविंद शिंदे, बाबा साळवे, उमेश कांबळे, सचिन गवळी आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांना स्वतःचे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत. महाविकास आघाडीची स्थापना केली नसती तर आज त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली नसती, असेही आठवले म्हणाले.

शरद पवार हे देशातील ज्येष्ठ व आदरणीय नेते असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी केले असते तर ते देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, असा दावा आठवले यांनी केला. तसेच, पूर्वी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला त्यांनी मान्य केला असता तर ते पंतप्रधानही होऊ शकले असते, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आता मावळली असली तरी शरद पवार यांचा पक्ष भविष्यात एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यातून समाज आणि देशाचे हित साधेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केल्यास भाजपने त्याचा सकारात्मक विचार करावा, असा सल्लाही आठवले यांनी दिला.

अयोध्येतील राम मंदिरातील कथित गैरव्यवहार अत्यंत गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी मंदिर प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या ॲट्रॉसिटी कायद्यावरील वक्तव्यावर भाष्य करताना आठवले म्हणाले की, हा कायदा वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. त्याचा गैरवापर होऊ नये आणि कोणावरही अन्याय होऊ नये, हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.

आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्री करण्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, “२०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी भाजप देणार नाही.”

भाषेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक असले तरी त्यातून इतर भाषांचा द्वेष करणे योग्य नसल्याचे सांगितले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तेथे मराठीबरोबरच विविध भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेत भाषण केल्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या प्रश्नावर व्यापक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अनुसूचित जातींतील उपवर्गीकरणाचा निर्णय न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आल्याचे सांगताना आठवले म्हणाले की, बौद्ध समाजाप्रमाणेच मातंग समाजातही शिक्षणाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची रिपब्लिकन पक्षाची भूमिका कायम असून समाजातील प्रत्येक वंचित घटकाला संविधानाने दिलेले हक्क आणि लाभ मिळाले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading