स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती योजनेचा पहिल्याच वर्षात ६ उदयोन्मुख खेळाडूंना मिळाला लाभ
पुणे : वयवर्षे १० ते १६ या वयोगटातील गरजू आणि खेळात पुढे जाण्याची क्षमता असलेल्या उदयोन्मुख टेबल टेनिस खेळाडूंना आवश्यक आर्थिक मदत करण्यासाठी स्थापन झालेल्या पुण्यातील स्पोर्ट्सविस्टा फाऊंडेशनची वर्षपूर्ती नुकतीच साजरी करण्यात आली. सुमारे १ वर्षापूर्वी स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात कलकत्त्या मधील अंकोलिका चक्रबर्ती व श्रीओश्री चक्रबर्ती या २ टेबल टेनिस खेळाडूंना शिष्यवृत्ती बहाल करून करण्यात आली होत. तेंव्हापासून १ वर्षाच्या आतच ही संख्या ६ खेळाडूंवर गेली आहे. यामध्ये बंगलोरचा एम. सिद्धांत, कलकत्त्याची तीताश चॅटर्जी, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राजवर्धन तिवारी व कलकत्याच्या अरीव दत्ता यांची भर पडली आहे. डेक्कन जिमखाना येथे नुकताच संपन्न झालेल्या वर्षपूर्ती कार्यक्रमात करण्यात आली.
कार्यक्रमास अनिकेत कोपरकर, सुजाता व सुनील बाबरस, भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सहसचिव यतीन टिपणीस, स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती योजनेला मदतीचा हात पुढे करणारे राजेंद्र तापडिया, जय शंकर, समीर माळी, आशुतोष आगाशे, मल्हार पाटेकर, विराज मुळ्ये व शिष्यवृत्तीप्राप्त सर्व खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक उपस्थित होते.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बाबरस, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व राष्ट्रीय टेबल टेनिस संघाच्या निवड समितीचे सदस्य असलेले अनिकेत कोपरकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असलेल्या सुजाता बाबरस यांनी गरजू, उदयोन्मुख टेबल टेनिस खेळाडूंना मदत करण्याच्या दृष्टीने स्पोर्ट्सविस्टा फाऊंडेशनची स्थापना केली आहे.
यावेळी बोलताना सुनील बाबरस म्हणाले, “योजनेअंतर्गत दरमहा १५ ते २५ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत १ ते २ वर्ष देण्यात येते. याबाबोरीबरच खेळ सुधारण्यासाठी आवश्यक मार्दर्शनही दिले जाते. प्रामुख्याने १० ते १६ या वयोगटातील खेळाडूंना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असून ज्या खेळाडूंना पालकांशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून आर्थिक मदत मिळत नाही अशा खेळाडूंन मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
उपक्रमाच्या सुरुवातीलाच स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती योजनेत सहभागी झाल्यावर १ वर्षातच अंकोलिका चक्रबर्ती या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये १५ वर्षाखालील मुली या श्रेणीत २५ व्या स्थानावरून ६ व्या स्थानावर झेप घेतली आहे. या शिष्यवृत्तीचे मानकरी असलेले सगळेच खेळाडू आपापल्या श्रेणीत राष्ट्रीय क्रमवारीमध्ये टॉप फाईव्हमध्ये अर्थात पहिल्या पाच मध्ये असल्याची माहिती अनिकेत कोपरकर यांनी दिली.
राष्ट्रीय क्रमवारीत अंकोलिका चक्रबर्ती १५ वर्षाखालील मुली या श्रेणीत अव्वल (पहिल्या) स्थानावर आहे. अरीव दत्ता १३ वर्षाखालील मुले या श्रेणीत पहिल्या स्थानावर, तीताश चक्रबोर्ती १३ वर्षाखालील मुली या श्रेणीत दुसऱ्या स्थानावर, राजवर्धन तिवारी ११ वर्षाखालील मुले या श्रेणीत दुसर्या स्थानावर, एम. सिद्धांत १३ वर्षाखालील मुले या श्रेणीत तिसऱ्या स्थानावर तर श्रीओश्री चक्रबर्ती १३ वर्षाखालील मुली या श्रेणीत पाचव्या स्थानावर आहे.
सुजाता बाबरस म्हणाल्या की, पुढील १ वर्षात स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती मिळणाऱ्या खेळाडूंची संख्या सध्याच्या ६ वरून १२ पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. मासिक शिष्यवृत्तीच्या व्यतिरिक्त अपेक्स स्पोर्ट्सचे अतुल बापट यांच्या मदतीने आम्ही गरजू २४ खेळाडूंना खेळाचे साहित्य मोफत उपलब्ध करून देणार आहोत.
