Monday, May 18, 2026
Latest NewsPUNE

‘आर्ट मॅजिक’मध्ये बालचित्रकार ते हौशी कलाकारांचा कलाविष्कार

 

पुणे : निसर्गचित्रांच्या मनोहारी रंगछटा, महादेव, कृष्ण, गणपती यांसारख्या देवी-देवतांची विविध शैलींमधील आकर्षक चित्रे, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची हुबेहूब रेखाटने, चारकोल माध्यमातील प्रभावी कलाकृती आणि प्रसिद्ध स्थळांची देखणी चित्रे यामुळे ‘आर्ट मॅजिक २०२६’ प्रदर्शन कला रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरले. कलर पेन्सिल, पोस्टर कलर, अॅक्रेलिक, ऑइल पेंटिंग आदी विविध माध्यमांतून साकारलेल्या कलाकृतींमध्ये वयाच्या अवघ्या तीन वर्षांच्या बालचित्रकारांपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांची तसेच हौशी चित्रकारांची कल्पकता आणि सर्जनशीलता पुणेकरांना अनुभवायला मिळाली.

आर्ट मॅजिक ड्रॉईंग क्लासेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्ट मॅजिक २०२६’ या १९ व्या चित्रकला प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगंधर्व कलादालन येथे या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच प्रसिद्ध चित्रकार मलिकार्जुन सी. सिंदगी व सुनील सोनावणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनाच्या आयोजिका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकार महालक्ष्मी भालचंद्र पवार असून सहआयोजक अंबादास भालचंद्र पवार आहेत. गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्याचे कार्य त्या करत आहेत.

महालक्ष्मी पवार म्हणाल्या, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. आजच्या मोबाईलच्या युगात मुलांनी कलेशी जोडले जावे आणि कलेच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. वयाच्या तीन वर्षांच्या बालचित्रकारांपासून ते हौशी कलाकारांपर्यंत सर्वांना एकाच मंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद आहे. प्रदर्शनात वंचित विकास संस्था व अभिरुची वर्गातील मुलांसाठी विशेष कलास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवार दि. १९ मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading