30 तारखेपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण – मनोज जरांगे
जालना प्रतिनिधी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अधिकारी दिरंगाई करत असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच याला जबाबदार आहेत. आम्ही आठ महिने वाट बघितली. यापुढे वेळ देणे शक्य नाही, असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर पुन्हा उपोषण करण्याची घोषणा करण्यात आली.
सरकारी अधिकारी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. शिंदे समिती दाखले शोधत नाही. अडीच वर्षापासून आंदोलने करून समाजाच्या पदरात काहीच पडले नाही. आपल्याला यात फडणवीस यांना दोष द्यायचा नाही. मात्र, त्यांनीच केलेल्या वक्तव्यानुसार मुख्यमंत्री असताना इतर मंत्र्यांना काही किंमत नसते. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याबद्दल ची जबाबदारी देखील त्यांचीच मानली पाहिजे. तुम्हाला मुख्यमंत्री मराठ्यांनीच केले याची जाणीव फडणवीस यांनी ठेवावी, असे जरांगे पाटील म्हणाले.
