Saturday, May 16, 2026
Latest NewsPUNE

एआयचा वापर न शिकल्यास मागे पडण्याचा धोका ; ज्येष्ठ पत्रकार मिलिंद खांडेकर यांचे मत


पुणे : बातमीदारी हे श्रमाचे काम आहे त्यामुळे एआयच्या काळातही बातमीदार टिकेल. पण, एआयचा वापर करणे जमले नाही तर मात्र मागे पडण्याचा धोका आहे. आपल्याला घोड्यासारखं फक्त रेसकोर्सवर जायचं नसेल, तर एआयचा वापर करणे शिकावे लागेल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार व इंडिया टुडे समूहाच्या तक चॅनल्सचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी व्यक्त केले.


फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्यातर्फे एआय क्रांती – पत्रकारिता बहरेल की ओसरेल? या विषयावर खांडेकर यांनी व्यंकटेश चपळगावकर स्मृति व्याख्यान दिले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, प्रतिभा चंद्रन, प्राची कुलकर्णी, मयूरेश कोण्णूर या वेळी उपस्थित होते.

खांडेकर यांनी पत्रकारितेतील स्थित्यंतराचा वेध घेत एआय वापरापर्यंतच्या प्रवासाचा वेध व्याख्यानात घेतला. ते म्हणाले, २००६मध्ये स्टार माझा ही वाहिनी सुरू करताना व्यंकटेश चपळगावकर यांच्याशी संबंध आला. मराठी वृत्तवाहिन्यांतील पहिल्या पिढीतील ते होते. एआयच्या काळात व्यंकटेश बहरले असते. धर्मराव आत्राम यांना व्यंकटेश यांच्या बातमीमुळे राजीनामा द्यावा लागला होता. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. व्यंकटेश चमकायला लागला असताना त्यांचे अपघाती निधन झाले.

खांडेकर पुढे म्हणाले की, पुण्यात ऑटो रिक्षा सेवा सुरू झाली तेव्हा टांगेवाल्यांचं काय होणार म्हणून आंदोलन झाले होते. मात्र, घोड्याचं काय होणार याचा विचार कोणी केला नाही. एआयच्या काळात माणसाची अवस्था घोड्यासारखी होण्याची भीती आहे.  आज घोडा केवळ रेसकोर्सवर आहे. म्हणजे, माणूस राहील, पण त्याला काही काम नसेल असे म्हटले जाते. चाळीस वर्षांपूर्वी वृत्तपत्रातील स्थिती आणि आजची स्थिती यात झपाट्याने बदल झाला आहे.

कम्पोझिटरसारखी माणसे कमी झाली. पूर्वी वृत्तवाहिनीमध्ये बातमीदाराबरोबर पाच सहा जण असायचे. आज मोबाइलवरून बातमी केली जाऊ लागली आहे. आता एआयचा काळ सुरू झाला आहे. आजवरच्या अनेक बदलांमध्ये पत्रकार टिकून राहिला. पण आता प्रयत्न न केल्यास टिकणं अवघड आहे. एआयचे परिणाम आता बाकी क्षेत्रात दिसायला लागला आहे. पुण्यातली मोठी कंपनी कर्जपुरवठा एआयच्या माध्यमातून करत आहे. आयटी कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. माणूसच करू शकणारी कामं आता एआय करायला लागला आहे. पत्रकारितेत काही बदलणार नाही हा भ्रम दूर करावा लागणार आहे.

गुगल आणि एआयमध्ये फरक आहे. गुगल ही मोठी लायब्ररी आहे. तर एआय प्राध्यापकासारखा आहे. एआयद्वारे ज्ञान, माहिती कशी मिळवायची हे लोकांना आता माहीत झाले आहे. क्रिएटिव्ह कामही एआयद्वारे करता येते. एआयच्या काळातही लोकांची बातम्यांची गरज राहणार आहे. वृत्तपत्रांपासून सर्व माध्यमं टिकून राहिली. पण पत्रकारिता टिकून राहणार का प्रश्न आहे. माहितीचा स्रोत असल्याशिवाय एआय काही करत नाही. पत्रकारितेसमोर निधी, पतपुरवठ्याचेही आव्हान आहे.

एआय प्रत्यक्ष मैदानात उतरून बातमी आणू शकत नाही. एआयच्या काळात जगभरात ब्ल्यू कॉलर किंवा श्रमाची कामं टिकतील असे म्हटले जाते. बातमीदारी देखील श्रमाचे काम आहे. त्यामुळे एआयच्या काळातही बातमीदार टिकणार आहे. पण, आपण एआय नाही शिकलो तर मागे पडण्याचा धोका आहे. आपल्याला घोड्यासारखं फक्त रेसकोर्सवर जायचं नसेल, तर एआय शिकावं लागेल, असे खांडेकर यांनी आवर्जून नमूद केले.

एआय वापरताना माहितीची पडताळणी करून घेणे महत्त्वाचे आहे. एआयच्या गैरवापराची भीतीही आहेच, पण त्यासाठीच पडताळणी गरज आहे. माध्यम संस्थाही बदल स्वीकारू लागले आहेत. या तंत्रज्ञानात आणखी किती बदल होतील, वापर कमी-जास्त होईल का या बाबत आताच काही बोलता येणार नाही, पण हे तंत्रज्ञान राहणार आहे, असेही खांडेकर यांनी स्पष्ट केले.

व्याख्यानानंतर खांडेकरांनी उपस्थितांच्या एआय संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यंकटेश चपळगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. प्रतिभा चंद्रन यांनी  व्यंकटेश चपळगावकर स्मृति व्याख्यान दरवर्षी आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. मयुरेश कोण्णूर यांनी खांडेकर यांच्या परिचय करून दिला. प्राची कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading