एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ तात्काळ ताब्यात घेत परिसराला बॅरिकेडिंग करून बंदोबस्त वाढविला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरामणी येथील मस्के कुटुंबाची सलग तीन घरे असून मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची बारावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि दहावीत शिकणारा मुलगा शिवराय मस्के (वय १६) हे तिघेजण राहत होते. गुरुवारी रात्री उष्म्यामुळे तिघेही घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने घराच्या गच्चीवर प्रवेश करून अचानक तलवारीने सपासप वार केल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया यांचा गच्चीवरच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला शिवराय जीव वाचविण्यासाठी खाली बैठकीच्या खोलीत धावत आला असावा, मात्र तेथेच त्याचाही रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ते सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह स्वतःच्या घरात राहत होत्या. शेजारी त्यांचे सख्खे दिर राहत असल्याची माहिती समोर आली आहे. घर, शेतजमीन आणि कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या तिहेरी हत्येमुळे बोरामणी गाव हादरून गेले आहे. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या रक्तरंजित घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. या हत्याकांडामागील नेमका सूत्रधार कोण आणि हल्ल्याचे खरे कारण काय, याचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
